पुणे | Pune
पुणे जिल्ह्यातील मावळमधील (Maval) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) जवळीस प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणाऱ्या कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पर्यटनासाठी आलेले ३० ते ४० जण वाहून गेल्याची माहिती एनडीआरएफच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
तर एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, ६ जणांची प्रकृती गंभीर असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत ३८ जणांना वाचविण्यात यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आज (रविवारी) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या घटनेतील मृतांना (एक्सवर) ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच एनडीआरएफची (NDRF) टीम घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे”, असे त्यांनी सांगितले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, ” कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल”, असे त्यांनी म्हटले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, “माझी आताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे. ३८ लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून, ही घटना कशी घडली, याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना बोललो आहे. याबाबत चौकशी होईल. जिल्हाधिकारी स्वत:त्या ठिकाणी पोहोचत आहेत. साडेतीनच्या अंदाजा दरम्यान ही घटना घडल्याची माहिती त्यांनी मला दिली. मी संपर्कात आहे. जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढण्याचेच प्राधान्य आपल्याला द्यायचे आहे.जे जखमी आहेत, त्यांचे जीव वाचवून त्यांना चांगले उपचार देण्यासाठी आपले प्राधान्य आहे. नवीन पुलाची वर्कऑर्डर १० जूनला दिली होती. हा जुना पूल होता, मी यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोललो आहे. जिल्हाधिकारी थोड्यावेळात तिथे पोहोचत असून, तिथे गेल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन ते पुन्हा माझ्यासोबत बोलणार आहेत.आता सध्या प्राधान्य फक्त लोकांचा जीव वाचवणे आहे. मी संपर्कात असून, जास्तीत जास्त लोकांना बाहेर काढून उपचार देणे प्राधान्य”, असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.





