पुणे | Pune
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचे प्रकरण सध्या खूप गाजतेय. कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. १८०० कोटी मूल्य असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकत घेतली, तसेच स्टँप ड्युटी म्हणून अवघे ५०० रुपये भरले असे आरोप पार्थ पवार यांच्या वर होत असून त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. पार्थ पवारचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे देखिल भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. दरम्यान या जमीन व्यवहारावरुन अजित पवारांना विरोधकांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर करुन टाकले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, निलंबित उपनिबंधक रवींद्र तारू, या तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी या फरार झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शीतल तेजवानी कुठे आहे?
पुण्यातील कथीत जमीन घोटाळ्याची मुख्य सुत्रधार शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती मिळत आहे. शीतल तेजवानीविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन बंद आहे. तसेच ती तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही. ती नवऱ्यासह देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू केली आहे, जेणेकरून तिचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का? हे याबाबत माहिती मिळणार आहे.
या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी , दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारूंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बावधन पोलिसांकडून या तिघांचाही शोध घेतला जात आहे. त्यासाठी वेगवेगळी पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. बावधन पोलिसांकडून या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
१८०० कोटींची जमीन पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने केवळ ३०० कोटींमध्ये घेतली तसेच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ ५०० रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला. महत्वाचे म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असे अंबादास दानवे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




