– राजेंद्र पाटील
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये दुफळी पडल्यानंतर प्रमुख सहा पक्ष, राज ठाकरे यांची ताकदीने उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राज्यात छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आदींनी स्थापन केलेली तिसरी आघाडी, वंचित बहुजन विकास आघाडी, मनोज जरांगे फॅक्टऱ आणि राजकीय पक्षांमध्ये झालेली बंडखोरी अशा पार्श्वभूमीवर विधानसभेची निवडणूक होत आहे. यातील सर्वच घटक राज्यातील सर्व भागात परिणाम करणारे नसले तरी राज्याच्या विविध भागात त्या-त्या भागातील राजकीय परिस्थितीनुसार परिणाम करणारे ठरणार आहेत हे निश्चित. याशिवाय महायुतीकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची केलेली सरबत्ती तर महाविकास आघाडीकडून सत्ता आल्यास कोणत्या योजना राबविणार याची प्रचारात आश्वासने दिली जात आहेत. त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. या सर्व गोष्टींबरोबरच त्या- त्या मतदार संघातील स्थानिक राजकारण, राजकीय परिस्थिती, उमेदवार याही गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत.
पुण्यात विधानसभेच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. पुण्यातील राजकीय वर्चस्वाबाबत बोलायचं झालं तर पुणे लोकसभा मतदार संघात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात सहाही विधानसभा मतदार संघात भाजपची बर्यापैकी पकड आहे. जिल्ह्याबाबतचे चित्र जरा वेगळे आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (पक्षफुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत) 10 आमदार आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे 8 आहेत, तर काँग्रेसचे 3 आमदार आहेत. लोकसभेमध्ये पवार कुटुंबामध्ये झालेली वर्चस्वाची लढाई विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळणार आहे. लोकसभेमध्ये नणंद- भावजयच्या जागी चुलत्या- पुतण्यांमध्ये लढत होणार आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यातील ‘हाय प्रोफाईल’ लढतीमुळे बारामती मतदार संघामध्ये काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही प्रामुख्याने राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये लढती होत आहेत. जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर सात मतदारसंघांत राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशा लढती रंगणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, यादृष्टीने या लढतींकडे पाहिले जात आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यावेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी अजित पवार यांना जाहीर समर्थन दिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना विशेष प्रभाव दाखविता आला नाही. बारामतीत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला. त्याउलट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली.
अजित पवार यांच्याकडील काही आमदारही शरद पवार यांच्या संपर्कात होते. मात्र, त्यांना पक्षात न घेता शरद पवार यांनी नवे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे अजित पवार विरोधात शरद पवार अशा लढती सात ठिकाणी होणार आहेत. अजित पवार यांना स्वत: बारामतीमधून त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे कडवे आव्हान राहणार आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना पक्षात घेत उमेदवारी दिली आहे. शेळके यांचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना आव्हान असणार आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री, भाजपने हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी महायुतीला धक्का दिला आहे. इंदापूरमध्ये अजित पवार समर्थक आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील अशी लढत होणार आहे. आंबेगाव तालुक्यात अजित पवार यांचे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना त्यांचे एकेकाळचे सहकारी देवदत्त निकम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आव्हान देणार आहेत.
जुन्नर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर आहेत. सत्यशील शेरकर काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शहरातील हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार चेतन तुपे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप असा सामाना रंगणार आहे. तर वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार समर्थक आमदार सुनील टिंगरे यांच्यापुढे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आव्हान असणार आहे. बापूसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या सात ठिकाणी पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या सात लढती राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील वर्चस्व ठरविणार आहेत.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील 11 मतदार संघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. पुणे शहरातील पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा या महत्वाच्या तीन मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर या मतदार संघांत महायुतीला अनुकूल वातावरण आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी आणि हडपसर मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे. काही ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रभावामुळे कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार याचीही उत्सुकता वाढली आहे.
सातारा जिल्हा
लोकसभा निवडणुकीनंतर सातार्यात पक्षांतरे झाल्याचे दिसून आले. फलटणमध्ये अजित पवार यांनी दिलेली उमेदवारी नाकारून आमदार दीपक चव्हाण यांनी तुतारी हाती घेतली. त्यासह कराडमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पाटणमधून शंभुराजे देसाई, माण- खटावमध्ये जयकुमार गोरे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले अशा अनेक दिग्गजांचे भवितव्य पणाला लागले आहे.
सातारा जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांनी दिग्गजांच्या झोपा उडवल्या आहेत. हे बंडखोर उमेदवार महायुती अथवा महाविकास आघाडी या आघाड्यांच्या विजयाची गणिते बिघडवू शकतात, का या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. पाटण आणि वाई मतदारसंघातील अनुक्रमे सत्यजित पाटणकर आणि पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोर उमेदवारीचा फटका कोणाला बसणार की बंडखोर वरचढ ठरणार या प्रश्नाची उत्सुकता आहे. सातारा जावली विधानसभा मतदारसंघात एकूण 11 उमेदवार रिंगणात आहेत तरी महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होत आहे. येथे सुद्धा रंगतदार लढत होईल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मतदारांना गाफील न राहण्याचे आवाहन करत आहेत. सातारा व जावली तालुक्यातील शिवसैनिकांची ताकद एकवटल्यास येथेही अमित कदम चमत्कार घडवू शकतात, असा दावा शिवसैनिक करत आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवार असून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्या चुरशीची लढत आहे .राष्ट्रवादी पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे मनोज घोरपडे उमेदवार आहेत. यामागे घोरपडे यांनी तब्बल पाच वर्षे मतदार संघात पायाभरणी केली आहे. त्यामुळे येथील लढतही रंगतदार होणार आहे. सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात 21 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीचे प्रभाकर घार्गे यांच्यातच लढत निर्णायक ठरणार आहे. घार्गे यांच्या मागे अनिल देसाई, प्रभाकर देशमुख यांच्यासह आमचं ठरलंय अशा दिग्गज नेत्यांची फळी उभी असल्याने घारगे तूल्यबळ लढत देतील, अशी अपेक्षा आहे. कराड दक्षिण मतदारसंघात हाय व्होल्टेज लढतीचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपच्या अतुल भोसले यांच्यात जोरात टक्कर होत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आहे. मात्र अतुल भोसले यांनी प्रचंड वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना यंदाची निवडणूक वाटते तितकी सोपी असणार नाही हे दिसत आहे.
वाई मतदार संघात तिरंगी लढत पाहायला मिळणार असून अपक्ष पुरुषोत्तम जाधव आमदार मकरंद पाटील व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने अरुणादेवी पिसाळ यांच्यासह 15 उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीत सरळ सरळ लढत असली तरी महायुतीतून जाधवांची बंडखोरी कोणासाठी धोक्याची घंटा ठरणार हे निकालाच्या दिवशी कळेल. खंडाळा तालुक्यातील सुमारे 92 हजार मतदान हे निर्णायक आहे. जाधव यांनी खंडाळ्याची अस्मिता ही टॅगलाईन वापरून जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
शंभूराजे देसाईंची प्रतिष्ठा पणाला
पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई शिवसेना ठाकरे पक्षाचे हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्यात प्रमुख लढत आहे. साहेब विरुद्ध सरकार या पारंपारिक लढतीला कदम यांच्या अचानक आलेल्या उमेदवारीचा तिसरा कोन आहे. पाटण मतदारसंघातून सलग दुसर्यांदा निवडून देण्याचा इतिहास नसताना गत वेळी शंभूराज देसाई यांनी ही कमाल साधली. त्यामुळे त्यांची ही प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे.
कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि वंचित आघाडीचे चंद्रकांत कांबळे यांच्यासह 17 उमेदवार रिंगणात आहेत. महेश शिंदे व शशिकांत शिंदे यांच्याच नावाचे सामायिक उमेदवार असल्यामुळे कदाचित मत विभागणीचा फटका बसू शकतो, अशी भीती आहे.