पुणे । Pune
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जयश्री मारणे यांना बावधनमधील प्रभाग क्रमांक १० मधून पक्षाने अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला असून, या निर्णयामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे महानगरपालिकेची निवडणूक यंदा तिरंगी होणार असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने पुण्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘जिजाऊ’वर पहाटेपासूनच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. रूपाली ठोंबरे आणि आमदार सुनील टिंगरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते. याच गजबजाटात पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप सुरू केले, ज्यात जयश्री मारणे यांच्या नावाचाही समावेश आहे.
जयश्री मारणे या पुण्याच्या राजकारणात नवीन नाहीत. त्यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) तिकिटावर कोथरूडमधून निवडणूक लढवली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. माजी नगरसेविका म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. २०२२ मध्ये त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या आठवड्यात त्यांनी बारामती हॉस्टेल येथे जाऊन अजित पवारांची भेट घेतली होती, तेव्हापासूनच त्यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राज्यात ‘गुन्हेगारीमुक्त राजकारण’ आणि ‘गुंडांना थारा देऊ नका’ अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांनी कुख्यात गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने विरोधकांकडून जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी विश्वातील व्यक्तींच्या नातेवाईकांचा राजकारणाकडे कल वाढल्याचे चित्र दिसत आहे. निलेश घायवळचा भाऊ आणि आंदेकर टोळीशी संबंधित व्यक्तींनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. अशातच एका बड्या टोळीशी संबंधित असलेल्या कुटुंबाला थेट सत्ताधारी पक्षाने उमेदवारी दिल्याने पुण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बावधन प्रभागातून जयश्री मारणे यांना मिळालेली उमेदवारी अजित पवार गटासाठी किती फायदेशीर ठरते की अडचणीची, हे येणारा काळच सांगेल. मात्र, या निर्णयामुळे महापालिकेत टोळीयुद्धाचे पडसाद उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असताना, दुसरीकडे अशा वादग्रस्त उमेदवारीमुळे आघाडीतील मित्रपक्षांमध्येही नाराजी पसरू शकते.




