अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच, नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याप्रकरणी आपली आक्रमक आणि ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देत असून नगर जिल्ह्यातील शेतकर्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. या विषयावर कोणताच वाद निर्माण करावयाचा नाही. मात्र, गेली अनेक वर्षे नगरकरांना त्यांच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात येत असून आम्हाला तुमचे पाणी नको, आमच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा देत राहू, असा स्पष्ट इशारा भाजपचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील माध्यमांशी बोलताना दिला.
नगरमध्ये बुधवारी माध्यमांशी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या स्थगितीबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा कागदपत्र अद्याप समोर आलेले नाही. हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रलंबित आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि विरोधक आपापली बाजू मांडत असून जेव्हा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईल, तेव्हा अहिल्यानगर जिल्ह्याची बाजू भक्कमपणे मांडली जाईल. आम्हाला दुसर्या कोणत्याही जिल्ह्यातील शेतकर्यांचे पाणी हिरावून घ्यायचे नाही. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यापासून कर्जत, जामखेड, श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील शेतकरी त्यांच्या हक्काच्या 3 ते 4 टीएमसी पाण्यासाठी वंचित राहिले आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्याचा अन्याय किती काळ सहन करायचा? आम्ही केवळ आमच्या हक्काच्या पाण्यासाठी भांडत आहोत. असे स्पष्ट करत भविष्यात डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून नगर आणि पुणे जिल्ह्यातील नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्यात प्रदेशिक वाद पेटण्याची चिन्हे शक्यता निर्माण झाली आहे.
या विषयावर माझ्याकडेही पुरावे
मुख्यमंत्री योग्य तोच निर्णय घेतीलवादग्रस्त विधाने करून समाजात किंवा राजकीय वर्तुळात वाद निर्माण करायचा आमचा कोणताही हेतू नाही. या विषयावर माझ्याकडेही अनेक कागदपत्रे आणि पुरावे आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. दोन्ही जिल्ह्यांतील शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री योग्य आणि सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साकळाईचा कुकडीशी संबंध नाही
नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागासाठी वरदान ठरणारी साकळाई योजनेचा कुकडी प्रकल्पाशी संबंध नाही. ही योजना वेगळी असून ती घोड प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेली आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदा नगर जिल्ह्याला जलसंपदा विभाग मिळाल्याने साकळाई आणि डिंभे-माणिकडोह बोगद्याचा विषय मार्गी लागला असल्याचा विश्वास डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केला.




