Tuesday, January 6, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : नोकरी सोडली अन् ड्रग्ज माफिया झाले! एमबीए पदवीधरांचे...

Pune Crime News : नोकरी सोडली अन् ड्रग्ज माफिया झाले! एमबीए पदवीधरांचे धक्कादायक कारनामे

पुणे (प्रतिनिधी)

पुणे शहर पोलिसांनी हायड्रोपोनिक गांजा तस्करीचा तपास करताना एक मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी अमली पदार्थांच्या विक्रीशी संबंधित तब्बल २५ क्रिप्टोकरन्सी वॉलेट्स शोधून काढले असून, त्यामध्ये अंदाजे ५ लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ४.५ कोटी रुपये जमा असल्याचे समोर आले आहे. हे व्यवहार पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या अंमली पदार्थांच्या विक्रीशी संबंधित आहेत.

- Advertisement -

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त सोमाय मुंडे यांनी सांगितले की, ही क्रिप्टो वॉलेट्स डार्क वेबवर सक्रिय होती आणि त्यांचे धागेदोरे स्कॅन्डिनेव्हियन देशांपर्यंत पोहोचले आहेत. या निधीचे रूपांतर डिजिटल चलनात कसे झाले आणि यामध्ये कोणत्या बँक खात्यांचा वापर करण्यात आला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भारतीय वित्तीय गुप्तचर विभागाची मदत घेतली असून हे वॉलेट्स गोठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

YouTube video player

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी हिंजवडी येथील एका फ्लॅटमधून चालणाऱ्या बेकायदेशीर अमली पदार्थ प्रक्रिया युनिटचा पर्दाफाश केला आहे, जिथे हायड्रोपोनिक गांजा तयार केला जात होता. याप्रकरणी आतापर्यंत एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला, दोन एमबीए पदवीधरांना आणि मुंबईतील कुर्ला व घाटकोपर येथील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या एमबीए पदवीधरांनी आपली चांगली नोकरी सोडून हे बेकायदेशीर काम सुरू केले होते आणि उत्पादनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) साधनांचा वापर केला होता. हे आरोपी अमली पदार्थांच्या विक्री आणि वितरणासाठी डार्क वेब, सोशल मीडिया आणि क्रिप्टोकरन्सीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. आतापर्यंत या कारवाईत सुमारे ३.५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

तपासादरम्यान अंमली पदार्थांच्या तस्करीची एक अनोखी पद्धत समोर आली आहे. भूतानमधील संशयित हे अमली पदार्थ एलईडी पट्ट्यांमध्ये लपवून पुण्याला पाठवत असत. या एलईडी पट्टयांमधील बल्बच्या आत ड्रग्ज लपवले जायचे आणि ते कुरिअरच्या माध्यमातून पाठवले जात होते. पोलिसांनी अशी कुरिअर पार्सल जप्त केली असून पाठवणाऱ्यांचे पत्तेही शोधले आहेत. हे अमली पदार्थ थायलंडमधून भूतानमार्गे पुण्यापर्यंत पोहोचवले जात होते. या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या भूतान आणि थायलंडमधील दोन मुख्य पुरवठादारांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलीस आता इतर कायदा अंमलबजावणी संस्थांशी समन्वय साधत आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...