पुणे | Pune
पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शहरातील रेव्ह पार्टीमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयासह सात जणांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नेमकी काय कारवाई करण्यात आली आणि त्यामध्ये काय साडपले याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोकेन, गांजा, दारू- बियरच्या बॉटल्स, हुक्का आणि कार हे सर्व पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सातही जणांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तसेच पकडण्यात आलेल्या सात जणांवर एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी भागातील स्टेबर्ड अझुर सुट याठिकाणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. खराडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) (11) अ, 21 (ब), 27 कोटपा 7 (2), 20 2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल पिंगळे, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) यांनी या कारवाईची माहिती दिली.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त
तसेच, ‘आरोपींकडून ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ज्यामध्ये २.७० ग्रॅमचे कोकेन सदृश पदार्थ, ७० ग्रॅम गांजा सदृश पदार्थ जप्त, आरोपींचे १० मोबाईल, दोन चारचाकी वाहने, हुक्कापॉट सेट, दारू आणि बिअरच्या बॉटल्स, हुक्का फ्लेवर हे जप्त करण्यात आले.’, असे पोलिस उपआयुक्तांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले सात जण
प्रांजल मनिष खेवलकर(41)
निखिल जेठानंद पोपटाणी (35)
समीर फकीर महमंद सय्यद (41)
सचिन सोनाजी भोंबे (42)
श्रीपाद मोहन यादव (27)
ईशा देवज्योत सिंग (22)
प्राची गोपाल शर्मा (22)
दरम्यान, पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपींना घेऊन पुणे पोलीस पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडे रवाना झाले आहेत. सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. तत्पूर्वी प्रांजल मनिष खेवलकर यांना सुरक्षेच्या कारणास्तव आधीच हजर करण्यात आले. थोड्याच वेळात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. सहा आरोपींना घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयातून न्यायालयाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




