पुणे (प्रतिनिधि)
एका २८ वर्षीय तरुणीवर प्रेमसंबंधांचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विराज गावडे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, ३२ वर्षीय विराज गावडे (रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण करून नोंदणी पद्धतीने विवाह केला. मात्र, हा विवाह त्याने आपल्या कुटुंबीय व मित्रांपासून लपवला. तिला पत्नीचा दर्जा नाकारत, वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० ते १२ लाख रुपये घेतले.
विराजची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर पीडित तरुणीने विवाहाची कबुली देण्याची मागणी केली. मात्र, विराजने तिला तिच्या जातीचा उल्लेख करत विवाह मान्य न होण्याचे कारण दिले आणि संबंध तोडले. ‘तू खालच्या जातीची आहेस, माझ्या कुटुंबीयांना हे मान्य होणार नाही’ असे सांगून तिचा मानसिक छळ केला.
तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, विराजने तिचा गर्भपात करवून घेतला आणि जातिवाचक अपशब्द वापरत तिला धमकावले. तसेच त्याचे वडील गजानन गावडे आणि भाऊ कुणाल गावडे यांनीही या प्रकरणात त्याला पाठिंबा दिला. पीडितेने आपल्या वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे मिळालेली नोकरी केवळ विराजच्या सांगण्यावरून नाकारली होती. त्यामुळे आज ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून नोकरीही गमावली आहे.
या प्रकरणी विराज गावडे, त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक, जातीवाचक अपमान आणि गर्भपातासंबंधीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.