नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंजाबमध्ये गेल्या २४ तासांत दोन पाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) मुख्यालयानंतर, मंगळवारी उशिरा रात्री अमृतसरमधील खासा येथील लष्करी तळाजवळ भीषण स्फोट झाला. या दोनही स्फोटांमुळे आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरु केला आहे.
जालंधरमध्ये स्कुटीचा भीषण स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, जालंधरमधील गजबजलेल्या बीएसएफ चौक’ परिसरात एका उभ्या असलेल्या स्कुटीचा भीषण स्फोट झाला. ही घटना पंजाब फ्रंटियर मुख्यालयाच्या अगदी बाहेर घडली. ज्या स्कुटीमध्ये स्फोट झाला, ती एका डिलिव्हरी बॉयची असल्याचे सांगितले जात आहे. साधारणपणे सायंकाळी आठ वाजता स्थानिकांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर आगीचे गोळे आणि धूर हवेत उडताना दिसत आहेत. याप्रकरणी 22 वर्षीय डिलिव्हरी बॉय गुरप्रीत सिंग याची चौकशी सुरू आहे.
अमृतसरच्या खासा कॅन्टोन्मेंट परिसरात स्फोट
जालंधरमध्ये झालेल्या स्फोटाच्या काही तासांनी अमृतसरच्या खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळही स्फोट झाल्याची माहिती समोर आले आहे. अमृतसर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एस. वारियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खासा कॅन्टोन्मेंट परिसराजवळ रात्री 10.50 च्या सुमारास जोरदार स्फोटाचा आवाज आला. हा परिसर अटारी-वाघा सीमेपासून अवघ्या 15 किमी अंतरावर आहे. प्राथमिक अंदाजानुसार, मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ग्रेनेड फेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लष्करी अधिकारी आणि पोलिसांनी तातडीने परिसराला वेढा घातला असून बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू आहे.
स्फोटानंतर राजकिय वातावरण तापले
या घटनांनंतर पंजाबमधील कायदा व सुव्यवस्थेवरून राजकारण तापले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांनी आम आदमी पार्टी सरकारवर कडक टीका केली आहे. “इतक्या संवेदनशील भागात स्फोट होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे,” असा आरोप मजीठिया यांनी केला आहे.




