Saturday, May 9, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime News : पुणे पुन्हा हादरले! ७० वर्षीय आजोबाचा ९ वर्षांच्या...

Pune Crime News : पुणे पुन्हा हादरले! ७० वर्षीय आजोबाचा ९ वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न, नात्याला काळिमा फासणारी घटना

पुणे । Pune

विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा माणुसकीला लाजवणारी आणि नात्यातील विश्वासार्हतेला तडा देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराची जखम ताजी असतानाच, आता पर्वती पायथा परिसरात एका ७० वर्षीय सख्ख्या आजोबानेच आपल्या ९ वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. सुदैवाने, शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून पीडित मुलगी सुरक्षित आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (५ मे) रात्री पर्वती पायथा परिसरातील एका वस्तीत ही खळबळजनक घटना घडली. पीडित मुलगी आणि तिचा भाऊ आपल्या आजोबांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी नराधम आजोबाने आपल्या नातवाला खाऊ आणण्यासाठी पैसे देऊन घराबाहेर पाठवले. घरात कोणीही नसल्याची संधी साधून या ७० वर्षीय नराधमाने आपल्याच सख्ख्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केला.

मात्र, हे घर पत्र्याचे असल्याने आणि परिसरात वर्दळ असल्याने एका स्थानिक महिलेला संशयास्पद हालचाली जाणवल्या. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारी तातडीने घराच्या दिशेने धावले. जेव्हा त्यांनी घरात पाहिले, तेव्हा घडणारा प्रकार पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलीची सुटका केली आणि नराधम आजोबाची धुलाई करत त्याला पकडून ठेवले.

घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि काही वेळातच पर्वती पोलीस स्टेशनबाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली. “त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या,” अशी मागणी करत संतप्त जमावाने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की पोलिसांना जमावाला शांत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, आरोपीला त्वरित अटक करण्यात आली असून त्याच्यावर ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर राजकीय पडसादही उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ते म्हणाले, “राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. नसरापूर, केज आणि पालघरच्या घटना ताज्या असताना पुण्यात घडलेली ही घटना चीड आणणारी आहे. सरकार केवळ निवडणुका आणि प्रचारात मग्न आहे का? असा प्रश्न पडतो. राज्यातील लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी सरकारने तातडीने ‘शक्ती कायदा’ लागू करावा किंवा विशेष अधिवेशन बोलवावे.”

पुण्यातील या घटनेने पुन्हा एकदा मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर केला आहे. नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून होणारे असे प्रकार समाजासाठी धोक्याची घंटा आहेत. मुलांच्या वागण्यातील बदल आणि त्यांच्या बोलण्याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. सध्या पीडित चिमुरडीची प्रकृती स्थिर असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे तिच्या कोवळ्या मनावर झालेला आघात पुसण्यासाठी समुपदेशनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

ताज्या बातम्या

11th Admission : अकरावी ॲडमिशन, नो टेन्शन.. उत्तीर्णच्या तुलनेत तब्बल ३५...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांना सर्वाधिक चिंता भेडसावते ती अकरावीच्या प्रवेशाची. मात्र, त्यांना टेन्शन घ्यायचे कारण नाही. जिल्ह्यात यंदा अकरावीच्या तब्बल ३५ हजारांवर जास्तीच्या...