Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधभाजपा-सेना पुनर्युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्हच

भाजपा-सेना पुनर्युतीच्या शक्यतेवर प्रश्नचिन्हच

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील दमदार अभिनयामुळे महाराष्ट्राचे राजकारण (Politics of Maharashtra) ढवळून निघाले असले तरी लगेच काही आश्चर्यकारक घडेल याची शक्यता तूर्त तरी दिसत नाही. राजकारणात केव्हाही आणि काहीही घडू शकते, राजकारणात कायम मित्र नसतात तसेच कायम शत्रूही नसतात. राजकारण हा अशक्यतांचे शक्यतेत रुपांतर करण्याचा खेळ आहे, असे विविधप्रकारे वर्णन केले जात असले तरीही त्याच राजकारणाला इंग्रजीमध्ये ‘बदमाशांचा खेळ’ (गेम ऑफ स्काऊंड्रल्स) (Game of Scoundrels) असेही म्हटले जाते. आणि या राजकारणाचा स्तर (level of politics) किती खाली गेला आहे हे आपण संसद वा विधिमंडळे वा खुल्या मैदानावरील राजकारणावरुन अनुभवतच आहोत.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळेचा त्याचा स्तर आणि आजचा स्तर यातील अंतरही आपण अनुभवत आहोतच. त्यामुळे उध्दव ठाकरे काही सूचक बोलले म्हणून त्याच्या आधारे कुणी सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याची घोर निराशा होण्याचीच शक्यता अधिक आहे. तरीही त्यांच्या बोलण्याचे कोणकोणते अर्थ निघू शकतात हे आपण कालपासून पाहतच आहोत.

- Advertisement -

मुळात एक बाब अतिशय स्पष्ट आहे व ती म्हणजे कथित महाराष्ट्र विकास आघाडीचे हे सरकार जनादेशाच्या आधारावर स्थापनच झाले नाही. उलट जनादेशाशी विश्वासघात करुन ते तयार झाले आहे. निवडणुकीपूर्वी या तीन पक्षांनी आघाडी केली असती व त्यात त्यांना बहुमत मिळाले असते तर त्याबद्दल कुणालाही विषाद वाटला नसता पण दोस्ती एकाशी करायची आणि तिची फळे दुसर्‍याच्या सोबत चाखायची ही एकप्रकारची दगाबाजीच आहे आणि सामान्य माणसाला ती आवडत नाही. कारण तो त्यांचा अपमान ठरतो आणि तो आपला अपमान आहे हेही त्याला चांगले कळते.

एक तर ते ‘भाजपा नको’ या केवळ नकारात्मक आधारावर स्थापन झाले आहे. तेही भाजपा सर्वात मोठा पक्ष असताना. शिवाय हे आपल्याला सी.बी.आय., ईडी, प्राप्तीकर छापे यांच्या माध्यमातून दिसतही आहे. त्या तपास यंत्रणांची कारवाई अद्याप तर्कसंगत शेवटापर्यंत पोहोचली नसली तरी त्या दरम्यान आपल्यावर आदळणारे रकमांचे कोटीकोटींचे आकडे, दहशतवादी कृत्यांच्या बातम्या आपल्याला अस्वस्थ करीतच असतात. यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले, यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेलीच कशी असे प्रश्नही आपल्याला पडतच असतात व तपासादरम्यान बोगस संस्थांमध्ये हवालामार्गे ते कसे जातात हेही कळत असते. अशावेळी त्यांच्या सात पिढ्यांचा उध्दारही होतच असतो.

एकनाथराव खडसे राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या वेळी ‘मी सीडी काढीन’ असे मोठ्या आवेशाने म्हणत होते पण त्यांची सीडी काही अजून निघाली नाही. दरम्यान, त्यांच्या ईडीतील चकरा मात्र सुरुच आहेत. त्यामुळे यांनी मविआच्या लोककल्याणाच्या कितीही बाता मारल्या तरी त्यात स्वकल्याण किती असते, हे लोकांना आता कळून चुकले आहे.

या सरकारला जर जनादेशाची एवढीच किंमत असती तर सरकार स्थापनेनंतर लगेच त्यांनी जनतेचा कौल घ्यायला हवा होता. पण तेवढे नैतिक बळ त्यांच्याजवळ नाही. म्हणून तर असे नथीतून तीर मारणे सुरु आहे. उध्दव साहेबांनी एकाच वेळी अनेक तीर मारण्याचा प्रयत्न केला एवढाच त्याचा अर्थ आहे.

पण एक बाब मात्र स्पष्ट आहे की, त्यांनी विनाकारण ही तिरंदाजी केलेली नाही. तसेही उध्दवजी हे अतिशय बेरकी राजकारणी आहेत. ते मृदुभाषी आहेत पण गोड बोलता-बोलता टोमणेही छान मारत असतात. ‘कहींपे निगायें कहीपे निशाना’ अशीच त्यांची शैली असते. औरंगाबादेतील भाषणही त्याच प्रकारचे होते. शरद पवारांनी मोठ्या आग्रहाने त्यांना मुख्यमंत्रिपदावर बसविले. काही काळ त्यांनी आपला रिमोट कंट्रोल चालविण्याचाही प्रयत्न केला. पण आता तो काळ संपला आहे.

मविआच्या स्थापनेपूर्वी उध्दवजी शरद पवारांकडे गेले होते. अहमद पटेल यांच्याकडेही गेले होते आणि दिल्लीला जाऊन सोनियाजी आणि राहुलजी यांनाही भेटले होते. पण आता कदाचित कोरोनामुळे असेल पण शरद पवारांना उध्दवजींच्या भेटीसाठी मातोश्री किंवा वर्षावरच जावे लागते.

किंबहुना त्यांच्या मागील काही भेटी याच ठिकाणी झाल्या आहेत. त्यामुळे मविआमध्ये कोण, किती पाण्यात आहे हे स्पष्ट व्हायला वेळ लागत नाही. मविआचा विचार केला तर आज त्या सरकारमध्ये तीन मंत्रिमंडळे आहेत. उध्दवजींच्या मंत्रिमंडळात संजय राऊत, अनिल परब आणि नार्वेकर. शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अजितदादा, दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील. काँग्रेसमध्ये मात्र दोनच मंत्री आहेत. त्यांचे मंत्री आहेत बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री आहेत नाना पटोले. मविआचे संमिश्र सरकार जरी म्हटले तरी नेत्यांना आपापले पक्ष चालवायचेच आहेत.

त्यामुळे पक्षवाढीचे प्रत्येकाचे प्रयत्न सुरुच असतात. त्यात परस्परांच्या कार्यकर्त्यांची ओढाओढीही सुरुच असते. आघाडीत काँग्रेस हाही एक घटक असला तरी त्याची कुणाला भीती वाटत नाही पण राष्ट्रवादी आणि शिवसेना परस्परांना ओळखून आहेत. सरकार स्थापनेच्या वेळी त्यांचे जसे संबंध होते तसेआता राहिलेले दिसत नाहीत. शिवाय आपण हिंदुत्व सोडलेले नाही, हे उध्दवजी प्रत्येक वेळी ठणकावून सांगत असतात. राज्याच्या शहरी भागात व विशेषत: मुंबई, पुणे शहरात शिवसेनेचे वर्चस्व आहे आणि विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे, हे कुणीही नाकारु शकत नाही.

दोघेच नव्हे तर तिघेही स्वबळाची भाषा वापरायला विसरत नाहीत. त्यामुळे आपापले गड शाबूत ठेवणे दोन्ही पक्षांना भागच आहे. त्यातून उध्दवजींना राष्ट्रवादीला इशारा द्यावासा वाटला असेल व त्यासाठी त्यानी औरंगाबादेतील कार्यक्रमाची निवड केली असेल तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

दुसरेही एक कारण असू शकते व ते म्हणजे आज महाराष्ट्रात सर्वत्र उच्च स्थानावरील भ्रष्टाचाराचीच चर्चा सुरु आहे. माजी खासदार किरीट सोमय्या तर भ्रष्टाचार्‍यांच्या मागेच अक्षरश: हात धुवून लागले आहेत. वास्तविक सोमय्या आमदार नाहीत की, खासदार नाहीत. पण आपल्या तल्लख बुध्दिमत्तेच्या आणि चार्टर्ड अकाऊंटंट या नात्याने व्यावसायिक कौशल्याच्या आधारावर एकेक प्रकरण खणून काढून त्याचा तपशील जाहीर करीत आहेत. त्यांच्यामुळे काही महाभागांनी सरकारी आदेशापूर्वीच आपली बेकायदा बांधकामे स्वत:हूनच बुलडोझरने उद्ध्वस्त केली आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी ‘तो काय ओसामा बिन लादेन आहे काय’, असा त्याचे नाव घेऊन भर विधानसभेत प्रश्न विचारला होता. तो सचिन वाझे आज पोपटासारखा बोलून सरकारी व्यवस्थेचे वाभाडे काढत आहे.

माजी गृहमंत्र्यांवर फरार होण्याची पाळी आली आहे. अशावेळी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न चाणाक्ष राज्यकर्त्याला करावाच लागतो. तो तर उध्दवजींनी केला नसेलना अशी शंकाही स्वाभाविकच निर्माण होते. अन्यथा ‘मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कसे सांगणार,’ असे उदगार उपमुख्यमंत्री अजितदादांना काढावेच लागले नसते. हे बरे झाले की, संजय राऊतांनी शनिवारी आपल्या स्टाईलने सर्व खुलासा करुन शिवसेनेच्या शब्दाचे महत्त्व अधोरेखित करुन मविआ सरकार पाच वर्षे पूर्ण करणारच असा निर्वाळा दिला.

पण या निमित्ताने ज्याला ज्याला जो जो संदेश, तोही रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीचे औचित्य साधून द्यायचा होता तो उध्दवजींनी देऊन टाकला. आता त्यानंतर जर ‘आम्ही पुन्हा युती करणारच नाही’ असे म्हणणे देवेंद्रजींना शोभले असते काय? त्यांनी जरतरच्या भाषेत या निमित्ताने अनैसर्गिक मविआ सरकार आपल्याच भाराने कोसळणार असेल तर त्याला त्यांनी नाही कां म्हणावे? म्हणून त्यांनीही तेवढ्याच कौशल्याने आपली प्रतिक्रिया दिली. आहे काय आणि नाही काय?

लोकांच्या व विशेषत: भाजपाच्या पातळीवर विचार केला तर आता कुणीही भाजपासेनेच्या पुनर्युतीला अनुकूल नाही. कारण युती सरकारात असताना सेनेने भाजपाला आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांनाही इतके अकारण छळले आहे की, आता तशी परीक्षा घ्यायला कुणीही तयार नाही. कालपासून समाजमाध्यमांवरच तेच प्रकट होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या