शिडी (प्रतिनिधी)
भाजपाचे जेष्ठ नेते आ.शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि भाजपा परिवारासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक जीवनाच्या वाटचालीतील एक दिलखुलास मित्र काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, आ.शिवाजीराव कर्डीले शुक्रवारी पंडित प्रदिपकुमार मिश्रा यांच्या दर्शनासाठी माझ्या लोणी येथील निवासस्थानी आले होते.एकत्रित आम्ही जेवणही केले. अतिशय मनमोकळ्या गप्पाही मारल्या. परंतू अचानक असे वृत्त येणे याचे मनस्वी दु:ख व्यक्तिगत मला झाले आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रभावी नेता म्हणून आ.कर्डीले यांची ओळख होती. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. तब्बल २५ वर्षांची त्यांची आणि माझी मैत्री राहीली, कधी मतभेदही झाले. परंतू मनामध्ये कटूता नव्हती. एक संवेदनशिल व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचा व्यक्तिगत पाठपुरावा असायचा. जिल्हा तसेच राहुरी तालुक्यातील शेती आणि सिंचनाच्या प्रश्नासाठी त्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहीली.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅकेंच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय करुन, त्यांनी बॅकेंला लोकाभिमुख करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. शेतक-यांच्या हितासाठी सरकारने निर्णय केले नाही असे निर्णय त्यांनी बॅकेंच्या माध्यमातून केले. जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कर्ज वसूलीचा निर्णय मागे घेवून शेतक-यांना दिलासा दिला.
एक मित्रत्वाचे नाते हे कर्डीले साहेबांशी माझे राहीले. लोकांसाठी समर्पित भावनेने काम करणारं व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये पाहायला मिळालं. राहुरी तालुक्याच्या किंवा अहिल्यानगरच्या विकास प्रक्रीयेत त्यांचे सहकार्यही राहीले. त्यांच्या निधनानं अहिल्यानगरच्या राजकारणाची मोठी हानी झाली. कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एक नेता आपण गमावला याचे मोठे दु:ख असल्याची भावना व्यक्त करुन, मंत्री विखे पाटील यांनी त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.




