लोणी |वार्ताहर| Loni
दहा वर्षे कृषी मंत्री म्हणून राहिलेल्या शरद पवार यांनी शेतकर्यांचे कोणते प्रश्न सोडविले, असा सवाल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करुन जिल्ह्यामध्ये केवळ विखे पाटलांना विरोध म्हणून कायमच त्यांनी संघर्ष केला परंतु या संघर्षाला येथील मतदाराने कधीही थारा दिला नाही, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. जिल्ह्यातील जनतेला नेहमीच पाण्यासाठी संघर्ष करायला लावणारे शरद पवार यांनी कुकडीचा पाणी प्रश्न, निळवंडे धरण त्याचबरोबर घाटमाथ्याचे पाणी वळवण्यासाठी नेहमीच विरोधात भूमिका घेतली आहे. ते मुख्यमंत्री असताना कुकडीचे केवळ दहा किलोमीटरचे काम करू शकले.
परंतु कुकडीच्या पाण्याचा प्रश्नासह निळवंड्याचे पोटचार्या आणि घाटमाथ्याचे आणि पश्चिमेचे पाणी वळवण्यासाठी यापुढे प्रयत्न करणार आहेत. जिल्ह्यातील दोन्ही जागा या महायुतीलाच मिळणार आहे. केवळ निवडणूक ही सोशल मीडियावर लढवली गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची आणि मतदारांची दिशाभूल करण्याचं काम विरोधी उमेदवाराने केले आहे पण त्यांनी खुद्द पारनेर मध्ये साडेचार वर्षांमध्ये काय विकास केला हे जनतेला माहिती होते. त्यामुळे या ठिकाणाहून डॉ. सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित आहे.
राहुल गांधी देखील आपल्या मतदारसंघातून पराभूत होतील. कारण राहुल गांधींची आणि काँग्रेसची जी प्रतिमा पूर्वी होती ती आता राहिली नाही. अनेक जुने जाणकार नेते काँग्रेसला केवळ राहुल गांधींच्या धोरणामुळे सोडून गेल्याने आज काँग्रेसचे मोठे वाटोळे झाले आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे जिल्ह्यात स्वतःला ज्येष्ठ नेते समजतात. केवळ विखे पाटलांना विरोध म्हणून या निवडणुकीमध्ये वातावरण निर्मिती केली. वातावरण तापवले असले तरी या निवडणुकीमध्ये जनता विरोधकांना धडा शिकवेल, असे सांगताना नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून येणार्या काळात पश्चिमेचे पाणी, रोजगार, शेतीचे प्रश्न यासाठी पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार येईल आणि राज्यात आणि देशात 400 पारचा जो नारा दिला आहे तो पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.