राहाता |तालुका प्रतिनिधी|Rahata
राहाता तालुक्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा 2202 वर जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला
असून 12 हजार 148 जणांचे आतापर्यंत स्वॅब तपासले आहेत. 1 हजार 970 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 200 करोना संक्रमीतांवर विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
आरोग्य यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही राहाता तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या काही कमी होत नाही. तालुक्यात दर दिवशी सरासरी 200 विविध टेस्ट केल्या जातात. त्यात दर दिवशी 30 ते 35 रुग्ण करोनाबाधित आढळत आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावात करोना पोहचल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे.
तालुक्याचा करोना बाधीतांचा एकूण आकडा दोन हजार दोनशेच्या पार गेला असून आतापर्यंत 12148 जणांचे स्वॉब घेतले आहेत. 1970 रूग्ण बरे झाले तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे.
दिवसभरात तालुक्यातील सरकारी पाच सेंटरवर 115 टेस्ट केल्या. यामधे 21 जण करोना बाधीत रुग्ण आढळले असून शिर्डी कोव्हिड रुग्णालयात 20, प्रवरा कोव्हिड रुग्णालयात 20 व शिर्डीच्या कोव्हिड सेंटर मिळून दोनशे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात राहाता 5, पुणतांबा 7, कोर्हाळे 1, दाढ 4, कोल्हार 4 करोना संक्रमीत रुग्ण सापडले आहेत.