Thursday, September 19, 2024
Homeनगरराहाता येथे शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

राहाता येथे शेतकर्‍यांचे ठिय्या आंदोलन

गोदावरी उजव्या कालव्याचे पाणी शेतीसाठी मिळावे या मागणीसाठी

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

गोदावरी उजव्या कालव्याच्या चालू उन्हाळी आवर्तनातून शेतकर्‍यांना सात नंबर फॉर्मवर पाणी मिळावे या मागणीसाठी चितळी उपविभागा अंतर्गत असलेल्या वाकडी, चितळी, रामपूरवाडी, जळगाव, गोंडेगाव, धनगरवाडी, पुणतांबा येथील गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी जलसंपदा विभागाच्या राहाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके म्हणाले, यावर्षी प्रचंड दुष्काळामुळे शेतीतील उभे पिके जळाली आहेत. पाटबंधारे विभागाने उन्हाळी आवर्तन उशिरा सोडले.

आता लाभक्षेत्रातील सर्व पिकांना सात नंबर फॉर्मवर पाणी मिळाले पाहिजे अशी मागणी करून ते म्हणाले, ब्रिटिश सरकारने नेहमीच दुष्काळी असलेल्या नाशिक नगर जिल्ह्यातील राहता, कोपरगाव येथील शेतीसाठी दारणा, गंगापूर ही धरणे बांधली. परंतू आपल्या सरकारने शेतीचे पाणी कमी करून शहरी, नागरी वसाहती व एमआयडीसीसाठी हे पाणी दिले. आमच्यावर नेहमीच अन्याय होत आहे. आज शेतीतील पिकांना पाण्याची गरज आहे. तरी गोदावरी कालव्याच्या टेलपासून सात नंबर फॉर्मवर संपूर्ण भरणे झाले पाहिजे. तसेच नांदूरमधमेश्वर बंधार्‍याला वक्राकार दरवाजे बसवून गोदावरी लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. त्याचा कालवा लाभक्षेत्रातील सर्व शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केला पाहिजे तसेच गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक राहाता जलसंपदा विभागाच्या कार्यालयात घ्यावी व यामध्ये शेतकरी प्रतिनिधी घ्यावे, अशी मागणी शेळके यांनी केली.

रावसाहेब गाढवे म्हणाले, जलसंपदा विभागाचे चुकीचे धोरण व शेतकर्‍यांचा शासनावर नसलेला दबाव यामुळे गोदावरी कालव्याचे लाभक्षेत्र पाण्याअभावी धोक्यात आले आहे. त्यातच शासनाने नांदूरमधमेश्वर बंधार्‍याला वक्राकार दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पावसाळ्यातील ओव्हर फ्लोचे पाणी गोदावरी कालव्याला मिळण्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. अप्पर वैतरणा धरणातील समुद्राला जाणारे ओव्हरफ्लोचे तीन ते चार टीएमसी पाणी सँडल गेटमधून टनेल मार्गे मुकणे धरणात वळविल्यास हे पाणी गोदावरी लाभक्षेत्राला उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पासाठी अवघा पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या कामाची वर्क ऑर्डर देखील निघाली आहे. परंतु तेथील स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम थांबले आहे. कमीत कमी खर्चात व कमी वेळेत गोदावरी लाभक्षेत्राला भविष्यात हे पाणी उपलब्ध होऊ शकते.

यावेळी रुपेंद्र काले म्हणाले, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील 182 गावांना आज टँकरने पाणीपुरवठा होतो आहे. आजही पिण्याच्या पाण्यावाचून लाभक्षेत्र वंचित आहे. मध्यंतरी निळवंडेचे तीन टीएमसी पाणी केटीवेअर भरण्यासाठी वापरले गेले. आपण बोललो नाही तर आपले प्रश्न सुटणार नाहीत. गोदावरी कालवे लाभक्षेत्राला नवीन पाणी निर्माण झाले नाही. आहे ते पाणी गेले. 7 कोटींचा निळवंडे प्रकल्प पन्नास वर्षानंतर आज 5177 कोटी पर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेलंगणामध्ये अवघ्या चार वर्षात 240 टीएमसीचा कालेश्वरम प्रकल्प पूर्ण झाला. चार वर्षात कालेश्वरम प्रकल्पाचे 1600 किलोमीटरचे कालवे निर्माण झाले.

यावेळी गणेश साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, संचालक संपतराव चौधरी, संचालक अनिल गाढवे, संचालक भाऊसाहेब चौधरी, संचालक विष्णूपंत शेळके, संचालक अलेश कापसे, भीमराज लहारे, सुरेश लहारे, शंकरराव लहारे, अनिल शेळके, कल्याणराव सदाफळ, बाळासाहेब कोते, नारायण शेळके, कैलास लहारे, अनिल गोरे व लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

सध्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून यासाठी सात आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे आवर्तन संपल्यानंतर कालव्याच्या टेलकडून चितळी सेक्शन पासून शेतीसाठी सात नंबर फॉर्मवर पिकांना पाणी देण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाचे अधिकारी निकम यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या