राहाता (प्रतिनिधी)
शिर्डीच्या पावन भूमीच्या छायेत असलेल्या राहाता तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारा आणि ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या राष्ट्रीय घोषणेची लक्तरे वेशीवर टांगणारा अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. एका बाजूला प्रगत समाजाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे राहात्यात गर्भलिंग निदानाचा एक अतिशय संघटित आणि अमानुष ‘आर्थिक माफिया’ फोफावला आहे.
‘दैनिक सार्वमत’ने गेल्या तीन दिवसांपासून या काळ्या धंद्याचे वाभाडे काढल्यानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र जसजसा या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे, तसतशी या ‘पांढरपेशा’ कसाईखान्यांची धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर येत असून यामुळे जनसामान्यांमध्ये संतापाचा वणवा पेटला आहे.
या काळ्या धंद्यातील ‘कास्ट’ आणि ‘कमिशन’चे गणित इतके पक्के आहे की, पेशंट घेऊन गेलेल्या एजंटने डॉक्टरला फी कमी करण्याचा आग्रह धरल्यास डॉक्टर थेट हतबलता व्यक्त करतात. आमची सोनोग्राफी मशीन्स ऑनलाईन आहेत, इथल्या तपासणीचे रिपोर्ट थेट वरिष्ठांना समजतात आणि त्यांनाही यातील मोठा हिस्सा द्यावा लागतो, अशी कबुली खुद्द एका एजंटने दिली आहे.
आता प्रश्न हा निर्माण होतोय की, जर यंत्रणा ऑनलाईन असूनही हे बेकायदेशीर उद्योग बिनबोभाट सुरू आहेत, तर मग या व्यवस्थेतला तो ‘विभीषण’ नक्की कोण? प्रशासनातील कोणत्या ‘वरिष्ठांच्या’ आशीर्वादाने हे पाप सुरू आहे, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. ५ डिसेंबरला छापा पडूनही पुन्हा त्याच केंद्रात चाचण्या सुरू होणे, हे प्रशासनाचे सपशेल अपयश असून गुन्हेगारांना कायद्याचा काडीचाही धाक उरला नसल्याचे हे जिवंत लक्षण आहे.
राहात्यातील या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे, हे बघायचे असेल तर नगर-मनमाड महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांकडे पाहणे पुरेसे ठरेल. शहरातील बहुतांश सेंटर्सकडे पार्किंगची सोय नसल्याने या गाड्या रस्त्याच्या कडेला लावल्या जातात. या गाड्यांच्या नंबर प्लेट्सवर नजर टाकली असता, त्यात महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यासारख्या शेजारील राज्यातील गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर भरणा असतो.
ज्या राज्यांमध्ये ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याची कडक अंमलबजावणी होते, तिथल्या पेशंटना हे एजंट हमखास निकालासाठी राहात्यात ओढून आणतात. विशेष म्हणजे, ज्या सेंटरवर ५ डिसेंबरला छापा पडला, तिथे केवळ तपासणी केली जाते; मात्र खरा ‘खेळ’ हा जवळच असलेल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये खेळला जातो. तिथे गर्भपाताची जीवघेणी सर्जरी केली जाते आणि धक्कादायक म्हणजे या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर न करता त्यांचे अननुभवी ‘असिस्टंट’ उरकतात. हा प्रकार म्हणजे थेट मानवी जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे.
‘सार्वमत’च्या वृत्तांकनामुळे आता संबंधित डॉक्टर आणि दलालांचे पार धाबे दणाणले आहेत. कायदेशीर कचाट्यातून कसे सुटायचे आणि पुरावे कसे नष्ट करायचे, यासाठी नामवंत वकिलांशी बंद दाराआड खलबते सुरू झाली आहेत. मात्र दुसरीकडे सामाजिक संघटना आणि महिला हक्क कार्यकर्त्या आक्रमक झाल्या असून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राहात्याचे नाव कायमचे बदनाम करणाऱ्या या ‘पांढरपेशा गुन्हेगारांविरुद्ध आता समाजाच्या सर्व थरांतून संताप व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून या रॅकेटचे कंबरडे मोडणार की प्रशासनाची ‘अर्थपूर्ण’ डोळेझाक अशीच सुरू राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुलगा-मुलगी भेद करून निसर्गाचा समतोल बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? राहात्यात सुरू असलेली ही ‘स्त्री भ्रूणहत्या’ म्हणजे समाजाचं नैतिक अधःपतन आहे. केवळ नफ्याचा विचार करणाऱ्या डॉक्टरांनी आणि वसुलीत मग्न असलेल्या प्रशासनाने लक्षात ठेवा हा जनसामान्यांच्या संतापाचा वणवा तुम्हाला खाक केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला आता आश्वासनं नकोत, थेट कारवाई पाहिजे !
-रत्ना चांदगुडे पाटील (संस्थापक अध्यक्ष, साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्था




