Tuesday, February 3, 2026
HomeनगरRahata Election Results : राहाता नगरपरिषद निवडणूक : डॉ. स्वाधिन गाडेकर की...

Rahata Election Results : राहाता नगरपरिषद निवडणूक : डॉ. स्वाधिन गाडेकर की धनंजय गाडेकर? नगराध्यक्षपदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

राहाता । बाळासाहेब सोनवणे

राहाता नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २ डिसेंबर रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडले असून, आता सर्वांच्या नजरा उद्या म्हणजेच रविवार, २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार, याची कमालीची उत्सुकता संपूर्ण शहरात निर्माण झाली आहे.

- Advertisement -

नगराध्यक्षपदासाठी थेट लढत या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी विखे पाटील गटाचे डॉ. स्वाधिन गाडेकर आणि लोकक्रांती सेनेचे धनंजय गाडेकर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती, त्यामुळे या दोघांपैकी कोण बाजी मारणार, हे आता अवघ्या काही तासांतच स्पष्ट होईल. या चुरशीच्या लढतीमुळे रिंगणात असलेल्या उमेदवारांची आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

YouTube video player

राहाता नगरपरिषदेच्या एकूण २० जागांसाठी ही निवडणूक झाली आहे. विखे पाटील गट आणि लोकक्रांती सेना या दोन्ही प्रमुख गटांनी प्रत्येकी २० उमेदवार रिंगणात उतरवले होते. याशिवाय इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार, तर २० नगरसेवक जागांसाठी तब्बल ७८ उमेदवार नशीब आजमावत आहेत.

अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकपदासाठी ५ ते ६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत मतांची मोठी विभागणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मतांच्या विभाजनाचा फायदा कोणाला होणार आणि कोणाला पराभवाचा धक्का बसणार, यावर सध्या शहरात उलटसुलट चर्चा रंगत आहेत. भाजप (विखे गट) वर्चस्व राखणार की लोकक्रांती सेना मुसंडी मारणार, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीच्या रिंगणात नगराध्यक्षपदाचे दोन्ही प्रमुख दावेदार ‘गाडेकर’ आडवावाचेच असल्याने, निकालाअंती राहाता शहराला गाडेकर आडनावाचाच नगराध्यक्ष मिळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र, ते डॉ. स्वाधिन असतील की धनंजय, याचा अंतिम फैसला उद्याच्या मतमोजणीनंतरच होईल. प्रशासनाकडून मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून उद्या दुपारपर्यंत शहराचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik News : वकिलांचे न्यायाधीशांवर आक्षेप! कामकाजापासून राहिले अलिप्त

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक वकील संघाने (Nashik Lawyers Association) जिल्हा न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या मनमानीसह कार्यपद्धतीवर आक्षेप घेत सोमवारी (दि. २) एकदिवसीय कामबंद आंदोलन...