Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता पालिका गटनेत्या पदावरून ममता पिपाडांची हकालपट्टी करा

राहाता पालिका गटनेत्या पदावरून ममता पिपाडांची हकालपट्टी करा

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता पालीकेत सत्ताधारी आघाडीच्या गटनेत्या ममता पिपाडा यांनी चार वर्षात एकदाही भाजपा रासपा महाविकास आघाडीच्या गटाची मिटींग बोलावली नाही.

- Advertisement -

गेल्या वर्षी झालेल्या स्थायी समिती व आघाडीच्या नगरसेवकांना निवडणूकीतून दुर ठेवून आघाडी सदस्यांवर अन्याय केली म्हणून आम्ही पाच नगरसेवक गटनेत्या ममता पिपाडा यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करत असल्याची मागणी जिल्हाधिकारी व पिठासीन अधिकारी यांच्याकडे केली आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या अर्जात म्हटले आहे की, राहाता पालीकेतील भाजपाचे नगरसेवक शारदाताई गिधाड, निलमताई सोळंकी, निवृत्ती गाडेकर, अनिता काळे, सचिन गाडेकर आम्ही पाच नगरसेवकांसह आणखी दोन नगरसेवक व एक नगराध्यक्षा निवडून आले होते. नगरपरीषदेचे कामकाज चालविण्यासाठी आम्ही सर्वानुमते ममता राजेंद्र पिपाडा यांची गटनेता म्हणून निवड केली होती.

मात्र मागील चार वर्षात गटनेत्या ममता पिपाडा यांनी आम्हा नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने कारभार केला. तसेच या काळात एकदाही भाजपा रासपा महाविकास आघाडी गटाची मिटींग बोलावली नाही. तसेच मागील वर्षी झालेल्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांपासून काही नगरसेवकांना निवडणुकीपासून वंचित ठेवले. त्यामुळे आम्ही उपगटनेत्या शारदाताई गिधाड यांच्या सुचनेनुसार गटाच्या सचिव निलम सोळंकी यांनी दि. 5 फेब्रुवारी रोजी गटाची मिटींग घेऊन उपगटनेत्या यांच्या अध्यक्षतेखाली बहुमताने गटनेत्या ममता पिपाडा यांची हकालपट्टी केली आहे.

तसेच दि. 9 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या विविध विषय समित्या निवडीवर आम्ही पाचही नगरसेवक बहिष्कार टाकत असून यापुढे गटनेत्या ममता पिपाडा यांनी मिटींगमध्ये आमचा वापर केल्यास तो ग्राह्य धरू नये, अशी मागणी या पाच नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून पालिका मुख्याधिकारी यांनाही त्या अर्जाच्या प्रती दिल्या आहेत.

आमच्या विरोधात थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डिपॉजिट जप्त करून जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. आता नेत्यांनीही घरी बसवले आहे. तरी त्यांनी आता षडयंत्रे रचण्याचे उद्योग बंद करुन घरीच आराम करावा, असा त्यांना सल्ला आहे.राहाता नगरपालिकेत काही नगरसेवकांना हाताशी धरून आमचे विरोधी लोक आमच्या विरोधात षडयंत्र रचित असून तीन वर्षापासून विरोधी असलेल्या नगरसेवकांच्या नावे अर्ज करायला लावण्यार्‍यांनी आम्हाला कीतीही विरोध करण्याचा प्रयत्न केला तर काहीही निष्पन्न होणार नाही. वास्तविक गटाची नोंदणी करून जिल्हाधिकार्‍यांकडे गटनेता ठरत असतो. एकदा गटनोंदणी झाल्यावर गटनेत्याने राजीनामा दिला तरच गटनेता बदलत असतो. यातून अर्ज करणार्‍याचे अज्ञान दिसून येते. तसेच काही नगरसेवकांनी माझ्या स्विय सहाय्यकाच्या घरी जाऊन विशिष्ट मागण्या केल्या त्या पूर्ण न झाल्यामुळे आदळआपट चालू आहे परंतु याचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही.

– ममता पिपाडा, नगराध्यक्षा

- Advertisment -

ताज्या बातम्या