Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : राहात्यातील गर्भलिंग चाचणी व गर्भपात प्रकरणाची कसून चौकशी

Ahilyanagar : राहात्यातील गर्भलिंग चाचणी व गर्भपात प्रकरणाची कसून चौकशी

जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे आदेश || जिल्हास्तरावरून स्वतंत्र पथक पाठवून करणार तपासणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राहाता तालुक्यातील नुकत्याच उघडकीस आलेल्या खळबळजनक गर्भलिंग निदान चाचणी व गर्भपातप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. मंगळवारी नगरला झालेल्या पीसीपीएनडीटीच्या (गर्भलिंग चाचणी विरोधी जिल्हास्तरीय दक्षता पथक) बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी राहाता तालुक्यातील सर्व गर्भ तपासणी केंद्र व गर्भपात केंद्रांची कसून तपासणीचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. यासाठी नगरहून जिल्हास्तरीय तपासणी पक्षक पाठवण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, राहाता तालुक्यातील गर्भलिंग चाचणी व बेकायदा गर्भपात याबाबतच्या दै. सार्वमतच्या वृत्तावर नगरच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी आरोग्य विभागाला याबाबत विचारणा करत ‘सार्वमत’मध्ये छापून येणार्‍या बातम्यानुसार राहाता तालुक्यातील सर्व गर्भचाचणी केंद्रांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरच नगरहून पथक राहाता तालुक्यातील सर्व केंद्रांतील मागील तीन महिन्यातील रेकॉर्ड तपासणार आहेत. या तपासणीत दोषी आढळून येणार्‍यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिला आहे.

YouTube video player

बैठकीत जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी जिल्हाधिकारी यांना राहाता तालुक्याबाबत आढावा दिला त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थित असणारे राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक यांच्याकडे ‘सार्वमत’ मध्ये येणार्‍या बातम्याबाबत सखोल चौकशी करत तालुका पातळीवरूनही पुन्हा सर्व गर्भ तपासणी केंद्रांची चौकशी करून त्याबाबतचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. सदर बैठक ही पीसीपीएनडीटीच्या गर्भलिंग चाचणी विरोधी जिल्हास्तरीय दक्षता पथका असल्याने राहात्यानुसार जिल्ह्यात अन्य तालुक्यात काय स्थिती आहे, याबाबत जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाकडे विचारणा केली.

तसेच नगरच्या बैठकीत राहात्याप्रमाणेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातीलच गर्भ तपासणी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल पुढील महिन्याभराने होणार्‍या बैठकीत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला नगरहून जिल्हाधिकारी डॉ. आशिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा शासकीय अभियोक्ता सतिष पाटील यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

लिंगगुणोत्तर कमी असणार्‍या तालुक्यात जनजागृती
जिल्ह्यात ज्याज्या तालुक्यात स्त्रीलिंग गुणोत्तर 800 पेक्षा कमी आहे. त्या तालुक्यात जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याच्या वतीने नागरिकांचे जनजागृती मिळावे घेण्यात येणार आहेत. तसेच स्त्री लिंग गुणोत्तरप्रमाण का कमी आहे, याची खातरजमा करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य खात्यासोबतच सर्व तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी देखील खांद्याला खांदा लावून काम करण्याची सूचना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. घोगरे यांनी दिली.

त्रिसुत्री कार्यक्रम प्रभावीपणे राबवा
लिंग गुणोत्तर अधिक सुधारण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनाला त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये कायद्याची प्रभावी प्रसिद्धी करून लोकसहभाग वाढवणे, आशा सेविका व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने माहिती संकलित करणे व उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करून त्यानुसार कृती आराखडा तयार करणे या बाबींचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारण्यास वाव आहे, अशा गावांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गरोदरपणात पहिल्या 12 आठवड्यांतच मातांची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. महानगरपालिका व ग्रामीण आरोग्य यंत्रणेने या मलवकर नोंदणीफ (अर्ली रजिस्ट्रेशन) प्रक्रियेवर भर द्यावा, जेणेकरून गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतील आणि पीसीपीएनडीटी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी होईल, अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या.

राज्य पातळीवरून चौकशीची मागणी
राहाता तालुक्यातील बेकायदा गर्भलिंग चाचणी व गर्भपातप्रकरणी जिल्हा प्रशासन, तसेच आरोग्य खात्याची चौकशी ही केवळ फार्स ठरू नयेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रासह सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. राहाता येथील बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी व गर्भपातप्रकरण गंभीर असून आरोग्य उपसंचालक यांच्यासह राज्य पातळीवरून चौकशी होण्याची मागणी राहाता तालुक्यातील जनतेच्या वतीने होत आहे.

त्या डॉक्टरांना निघणार नोटीस
राहाता तालुक्यातील एका डॉक्टरांने माध्यमांना मुलाखत देत तालुक्यातील कोणत्या रुग्णालयात गर्भलिंग चाचणी व गर्भपात सुरू आहेत. याची माहिती सर्वांना आहे, अशी प्रतिक्रिया देत एका प्रकारे तालुक्यातील या बेकायदा प्रकरणावर शिक्कामोर्तब केले होते. यामुळे जिल्हा प्रशासन संबंधीत खासगी डॉक्टर यांच्याकडून याबाबत खुलासा घेणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रशासनाला माहिती द्या.. नावे गोपनीय ठेवणार
राहाता तालुक्यातील गर्भलिंग चाचणीप्रकरण व बेकायदा गर्भपातप्रकरणी प्रशासनाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांकडे या प्रकरणी काही पुरावे असल्यास ते जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे, प्रशासनाला माहिती देणार्‍यांची नावे गोपी ठेवण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी बैठकीनंतर ‘सार्वमत’ शी बोलताना केले आहे.

राहाता तालुक्यातील या प्रकरणावर गेल्या पाच ते सहा दिवसापासून ‘सार्वमत’ने अतिशय आक्रमकपणे प्रसिद्ध केलेल्या वृत्ताचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे. राहात्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील पीसीपीएनडीटी दक्षता समित्या यांनी आणखी जागृतपणे तालुक्यात लक्ष ठेवून स्त्री अर्भकांचे गर्भपात होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...