राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मृत्यूलोकात जन्म घेतलेल्या प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात. त्यामुळे वाईट कर्म टाळून, जीवनात सुख आणि शांती मिळवण्यासाठी शिवभक्तीचा मार्ग स्वीकारा, असे मोलाचे प्रतिपादन प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी शिर्डीजवळील अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवेवर सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेच्या तिसर्या दिवशी केले.
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तिसर्या दिवशी कथेला उपस्थित शिवभक्तांनी गर्दीचा उच्चांक गाठला.
पंडित मिश्रा यांनी यावेळी शिवकथेचा महिमा, एका तांब्या पाण्याने केलेल्या जलाभिषेकाचे महत्त्व, तसेच माता पार्वतीची आराधना, हरतालिका व्रत आणि शिव-पार्वती विवाहावर सखोल भाष्य केले. पंडित मिश्रा म्हणाले, शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मंडपात बसलेल्यांनी भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कथा ऐकताना मनात कोणतेही वाईट विचार आणू नका. सर्वांचे कल्याण होईल, असाच विचार करा. भक्तीमध्ये समर्पण भावना असावी. जर तुम्ही समर्पित भावनेने शिवभगवंताला एक तांब्या पाण्याचा जलाभिषेक केला, तर तो तुम्हाला सर्व संकटातून तारेल.
यावर त्यांनी गवताच्या काडीचे उदाहरण दिले. समुद्र मोठमोठी जहाजे बुडवतो, पण एक गवताची काडी सहज तरंगते, कारण ती समर्पित भावनेने असते. त्याचप्रमाणे, भगवंतावर पूर्ण विश्वास असेल तर जग तुम्हाला बुडवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जीवनातील दुःख, आजार आणि चिंता दूर करायच्या असतील, तर शिवालयात जाऊन बसा, आई-वडिलांच्या जवळ बसा किंवा सद्गुरूंच्या पायाजवळ वेळ घालवा. मानवी शरीरात चुकीच्या गोष्टी टाकू नका. दारू आणि इतर व्यसनांपासून दूर राहा. जर नशा करायचीच असेल, तर ती शिवनामाची करा, असे आवाहन करत पंडित मिश्र यांनी ‘शिवनाम होठो पे चढ गया रे!’ हे भजन सादर केले. या भजनावर संपूर्ण कथास्थळ थिरकले.
पंडित मिश्र यांनी सांगितले, आपल्या मुलांना खूप मेहनत करण्याचा आणि शिवमंदिरात जाऊन एक तांब्या पाण्याचा जलाभिषेक करण्याचा सल्ला द्या. हरतालिका व्रताचे महत्त्व सांगताना त्यांनी हे व्रत मुलींपासून वृद्धांपर्यंत सर्वजणी करतात असे सांगितले. व्यासपीठाजवळ शिव-पार्वती विवाह सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. कालच्या कथेला रमेशगिरी महाराज, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, धनश्रीताई विखे पाटील, ध्रुव विखे पाटील, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राहाता बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह राज्यभरातील लाखो भाविक उपस्थित होते.
जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक कथेला आले असले तरी, जनसेवा फाउंडेशनने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील स्वतः सर्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत आहेत. आज बुधवारी कथा दुपारी 1 ते 4 या वेळेत असेल, तर उद्या गुरुवारी सकाळी 8 ते 11 या वेळेत कथेची सांगता होणार आहे.
विखे पाटलांनी अध्यात्मिक ‘यज्ञा’ चे पुण्य मिळवून दिले
पंडित मिश्रांनी शिवमहापुराण कथेतील उत्कृष्ट नियोजनाची प्रशंसा केली
राहाता |वार्ताहर| Rahata
शिर्डीजवळील अस्तगाव पिंपरी निर्मळ शिवेवर सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला भाविकांची विक्रमी गर्दी होत असून, या गर्दीच्या नियोजनाबद्दल विखे पाटील परिवाराचे मोठे कौतुक होत आहे. कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्वतः विखे परिवाराच्या व्यवस्थापनाचे तोंडभरून कौतुक केले.
कथेच्या दुसर्या दिवशी बोलतांना पंडित मिश्रा म्हणाले, विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिवमहापुराण कथेचे आयोजन करून भाविकांना अध्यात्मिक यज्ञ चे पुण्य मिळवून दिले. त्यांच्या या विधानाने हा आध्यात्मिक यज्ञ प्राचीन काळातील धार्मिक आणि राजकीय यज्ञाप्रमाणेच भव्य असल्याचे दिसून आले. पंडित मिश्रांनी पुढे सांगितले की, विखे परिवाराच्या चार पिढ्यांना जनतेचा आशीर्वाद लाभला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या आयोजनामुळे लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळत आहेत.
धर्म, समाज, राजकारण आणि आयोजन या सर्व क्षेत्रांत डॉ. सुजय विखे पाटील यांनी उत्तम समतोल साधला असून, त्यांच्या भक्तिभावामुळे त्यांना भाविकांचे प्रेम मिळाले आहे. कथेच्या यशस्वी नियोजनामुळे डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्वगुणांची नवी झलक दिसून आली आहे. या आयोजनामुळे शिर्डी परिसरात अभूतपूर्व श्रद्धा आणि शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.





