Saturday, November 2, 2024

राहुल

त्या दिवशी राहुल वर्गात आला. तो वर्गात आल्या आल्या वर्गात एक घाणेरडा वास सुटला. वर्गात येताच तो ज्या जागेवर बसतो तिथून मुले-मुली लांब झाली. मी फळ्यावर लिहित होते. दुसरीचा वर्ग असल्याने एखादा घटक समजावून सांगण्यासाठी फळ्याचा चांगला उपयोग होतो. अचानक मागे गडबड सुरू झाल्याने मी मागे वळाले. सगळी मुले राहुलकडे बघून हसत होती आणि लांब सरकत होती. मुलांच्या गडबडीतून येणार्‍या आवाजातून समजले होते की राहुल त्याचे दप्तर वायरच्या पिशवीमध्ये घेऊन आला होता आणि त्या पिशवीचा उग्र दर्प वर्गात पसरला होता. लता म्हणाली, काय वं, काय घिऊन आल्येस? तेवढ्यात सुमित समजावणीच्या स्वरात म्हणाला, डब्बा सांडला अस्येल त्याचा संगीता म्हणाली, साळत मिळत्ये न ज्येवान. मंग कशाला अन्ल्हाय डब्बा? पूनम म्हणाली, पण त्येच्या डब्ब्यात खाऊ आणला असल त्याने निखिल म्हणाला, पर खाऊचा ह्यो असला बदबू कसं येईल? सगळ्यांचे प्रश्न, तर्क आणि त्याच्यापासून त्याचे मित्र लांब बसले.

या घडामोडीमुळे राहुलने इतक्या वेळ दाबून ठेवलेले रडू मोठ्याने बाहेर काढले. आता त्याला शांत कसे करावे, असा प्रश्न उभा राहिला. मी त्याला फळ्याजवळूनच शांत करत म्हणाले, रावल्या, ही पोरं हसताय म्हणून तू का रडतोस? तू पण हस की. चल इकडे बघ. नाक भरलेय बघ पूर्ण. जा बाहेर जाऊन नळावर तोंड धुवून ये. राहुल बाहेर गेल्यावर मी त्याच्या दप्तराजवळ गेले. दप्तरावर बर्‍याच माश्या घोंगावत होत्या. जवळ गेल्यावर आणखीच उग्र आणि घाणेरडा वास यायला लागला. त्या वासाने मलाच एकदम मळमळल्यासारखे झाले. मी तिथून चटकन बाजूला सरकले आणि पुन्हा फळ्याजवळ गेले. पुढच्या दहा मिनिटांत राहुल वर्गात परत आला आणि तो त्याने दप्तर ठेवलेल्या जागेपाशी न बसता माझ्या खुर्चीजवळ येऊन बसला. पुढचे वीस मिनिटे तो घटक शिकवून झाला आणि मी मुलांना फळ्यावरील बाबी वहीत लिहून घ्या, असे सांगितले. आता मात्र वही काढण्यासाठी राहुलला त्याच्या दप्तराकडे जावे लागणार होते. तो उठला आणि म्हणाला, म्या ह्ये समद उदयाला लिव्हतो. आता तिकड जाऊन पिशी उघडली तर पोरं हासतील समदी.

- Advertisement -

मी : ठिके. लिही उद्या. पण मला सांग. तुझ्या पिशवीचा एवढा वास कसला येतोय. काय ठेवले आहेस त्यात? राहुल : सांगू? तुमी हासणार नाय न?

मी : नाही रे. सांग काय ते. इतका वास येतोय. मला पण त्रास होतोय त्याचा. तुझ्या शब्दात सांगायचे झाले तर ओकारी येतेय. मी असे बोलताच तो पटकन त्याच्या दप्तरापाशी गेला. त्याने ती पिशवी उचलली आणि वर्गाबाहेर नेऊन ठेवली. तसाच तडक पुन्हा नळावर जाऊन हातपाय धुवून आला आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला.

मी : काय रे, काय अचानक असा पळत सुटलास एकदम?

राहुल : तुमाला वोकारी येतय ना…मंग कश्याला उगा?

मी : अरे वा…इतकी काळजी? ढहरपज्ञ र्ूेी बेटा. आता सांग काय आहे त्या पिशवीत?

राहुल : त्ये काल बाजार व्हता गावचा.

मी : मग?

राहुल : काल सांच्याला बाबा (येथे आजोबा या अर्थाने) आणि माई (येथे आजी या अर्थाने) गावात आल्ये व्हते. येताना बाजार पिशी (पिशवी ) भुलले. (विसरले). मग हिकडं आल्ये. आपली साळा सुटली व्हती. मंग त्येनी माझं समद पुस्तकं दीदीच्या ब्यागेत टाकली अन् ही पिशी न्येली.

मी : असे झाले का. असू दे. पण त्या पिशवीत भाजी वगैरेचा वास नाही.

राहुल : त्येच ना. त्येनी भाजी आनायची व्हती ना. पर त्येनी त्यात दुसरेच काही आणलय. समद एकाच टाकले. त्येचा बदबू येतंय.

मी : अरे मग तू ती पिशवी धुवून आणायची ना?

राहुल : मंग आज येता नस्त आलं. पिशी सुकाया येळ गेला असता. त्यात आज आभूट बी हाये. पानी (पाऊस) पडल केवा बी.

मी : अरे… खरेच मोठा आहे रे हा प्रोब्लेम आणि तुला शाळेतून मिळालेले दप्तर तू काय केले?

राहुल : त्ये वापराया काढलं की खराब व्हइन. मंग त्ये लांबच्या खोलीत ठिवून दिलं. हे ऐकून मी डोक्यावर हात मारला. आहे ती वस्तू खराब होईल म्हणून बाजूला ठेवून पिशवीत दप्तर आणायचे म्हणजे जरा अवघड झाले. मी त्याला म्हणाले, आता मला त्रास होतो म्हणून तू पिशवी बाहेर ठेवलीस ना? तसे मला त्रास होऊ नये म्हणून तू दप्तर वापरायला काढ आणि झाले खराब तर पुढच्या वर्षी मिळेल नवीन. त्याच्या आत खराब झाले तर मी नवीन घेऊन देईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या