पुणे । Pune
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात खळबळजनक माहिती सादर केली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतचोरी झाल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे लेखी स्वरूपात न्यायालयाला सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधातील कथित बदनामीप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती न्यायालयात दिली.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवत पुरावे सादर केले होते. या आरोपांमुळे देशभरात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा देत ‘आमच्या मतांची चोरी झाली’ अशी निदर्शने केली.
पुण्यातील विशेष न्यायालयात सादर केलेल्या लेखी निवेदनात मिलिंद पवार यांनी सांगितले की, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधी यांना धमकी देत म्हटले आहे, “राहुल गांधी यांनी नीट वागावे, नाहीतर त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांचे जे झाले, तेच त्यांचे होईल.” याशिवाय, भाजपच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना ‘दहशतवादी’ संबोधले आहे. सध्याचे तणावपूर्ण राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचे गोडसे कुटुंबाशी असलेले संबंध पाहता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे पवार यांनी नमूद केले. हिंदुत्ववादी जहाल गटांकडूनही त्यांना धोका असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांना आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाने राहुल गांधी यांना शपथपत्र सादर करण्याची सूचना केली. यावर राहुल गांधी यांनी ठाम भूमिका घेत सांगितले, “मी सादर केलेली सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवर आधारित आहे. ती माझी वैयक्तिक माहिती नाही. मग मी शपथपत्र का द्यावे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्याने खटल्याला नवे वळण मिळाले आहे. निवडणूक प्रक्रियेवरील आरोप आणि त्यानंतरच्या धमक्यांमुळे देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी काय दिशा घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




