नवी दिल्ली | New Delhi
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज (गुरुवार) दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मत चोरीवरून (Vote Chori) भाजपवर गंभीर आरोप केले. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मतदारसंघांचे उदाहरण देत मते वाढविण्यात आल्याचा आरोपही केला.
राहुल गांधी म्हणाले की, “काँग्रेस (Congress) समर्थनार्थ असणारी मतदारांची नावे मतदार यादीतून (Voter List) जाणीवपूर्वक वगळण्यात आली. दलित आणि आदिवासींची देखील मते वगळण्यात आली आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर वापरण्यात आले. कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून ६०१८ मते डिलीट केली. तर महाराष्ट्राच्या राजुरा मतदारसंघातून ६८५० मते वाढली. वेगवेगळ्या राज्यातील नंबर वापरून हे मते डिलीट करण्यात आली आहे. सुर्यकांत व्यक्तीने १४ मिनिटात १२ डिलिट अर्ज भरले”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या मतचोरांना मदत करत आहेत. मी लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून ही जबाबदारीने माहिती शेअर करत आहे. आम्ही पुराव्यासह या गोष्टी मांडत आहोत. १००० टक्के आम्ही सर्व पडताळणी करून या गोष्टी समोर आणत आहोत. भारताची लोकशाही वाचवणे हे आमचे कर्तव्य आहे. १० पैकी ८ जागी काँग्रेस (Congress) विजयी झाली होती, त्याठिकाणची मते वगळण्यात आली. हे सर्व एका शक्तीने केले आहे. युक्यू, जेजेडब्लू अशी नावे मतदार यादीत आहेत. हरीयाणा, युपी, कर्नाटकमध्येही अशीच नावे वगळण्यात आली”, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
कर्नाटक सीआयडीला अजूनही उत्तर नाही
कर्नाटक सीआयडीने मतचोरी संदर्भात गुन्हा दाखल केला. त्यानंतर १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर एकदाही उत्तर पाठवले नाही. ज्या ज्या बूथवर काँग्रेस मजबूत आहे. तिथे मतदारांची नावे वगळण्यात येत होती. निवडणूक आयोगाने हा पूर्ण तपास रोखला. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अनेक मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही असेच घडले. हरियाणा येथेही हेच घडले. बोगस नावे, बनावट पत्ते देऊन मतदार वाढवण्यात आले. ज्ञानेश कुमार यांनी मतचोरीला पाठिंबा देणे थांबवले पाहिजे. निवडणूक आयोगाने १ आठवड्याच्या आत याचे पुरावे द्यावेत अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली.
नावं कशी डिलिट करण्यात आली ?
कर्नाटकातील आलंद मतदारसंघात ६ हजार १८ मते डिलिट करण्यासाठी विविध लोकांच्या नावे अर्ज करण्यात आला होता. परंतु ज्या लोकांच्या नावाने अर्ज करण्यात आला होता त्या लोकांनी प्रत्यक्षात असा अर्ज केलाच नव्हता. त्या लोकांच्या नावाचा वापर करून बाहेरच्या राज्यातून हे अर्ज करण्यात आले होते आणि जिथं काँग्रेसची ताकद आहे अशा बूथवरील मतदारांची नावे अत्यंत शिताफीने डिलिट करण्यात आली. सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करून १२ मते डिलिट करण्यात आली. मात्र सूर्यकांत यांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती,” असं सांगत ज्या सूर्यकांत यांच्या नावाने ही नावे डिलिट करण्यात आली त्या सूर्यकांत यांना राहुल गांधींनी माध्यमांसमोर बोलावलं आणि त्यांनाच याबाबत अधिक माहिती देण्यास सांगितले. त्यानंतर मी मते डिलिट करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता, असे सूर्यकांत नावाच्या व्यक्तीने म्हटले.




