नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मतचोरीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मतचोरी होत असल्याचे अनेक पुरावे दाखवत निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर टीका केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मतचोरांचे संरक्षण करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत आमच्याकडे मतदार वगळले जात आहेत असा रिपोर्ट येत होता. काँग्रेसचे, विरोधकांचे नावे मतदार यादीतून काढले जात होते. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक मतदार यादीतून काढले जातात. जी नावे यादीतून वगळली जातात ती विरोधकांची असतात असा आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
ज्ञानेश कुमार मतचोरी करणाऱ्यांना मदत करत आहे
निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरी करणाऱ्यांना मदत करत आहेत असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पुरावे सादर केले. ते म्हणाले, ‘कर्नाटक सीआयडीकडून आयोगाला १८ पत्रे पाठवण्यात आली. त्याबाबत कुमार यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिले पत्र पाठवण्यात आले. पण त्यात दिलेल्या माहितीची गरज नव्हती. कर्नाटक सीआयडीने १८ वेळा पत्र पाठवूनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही उत्तर मिळाले नाही. आयुक्त मतचोरांना मदत करत असल्याचे पुरावे आहेत. आयोगाच्या आतमधून मदत मिळत आहे. निवडणूक आयोगाच्या आतमधून आम्हाला माहिती मिळत आहे, आम्हाला मदत केली जात आहे. हे थांबणार नाही. देशातील लोक मतचोरीला थारा देणार नाही.’
अन्यथा देशातील तरुण तुम्हीच संविधानाच्या हत्येत
यामुळे तपासकर्त्यांना मूळ गुन्हेगारांपर्यंत पोहोचू न देण्यामागे मुख्य निवडणूक आयुक्तांचा सहभाग असल्याचे राहुल गांधी म्हणाले. गांधींनी ज्ञानेश कुमार यांना अल्टीमेटम देत एका आठवड्यात आवश्यक डेटा कर्नाटक सीआयडीला देण्याची मागणी केली. अन्यथा देशातील तरुण तुम्हीच संविधानाच्या हत्येत सहभागी आहात असे मानतील, असा इशाराही त्यांनी दिला.
राहुल गांधी पुढे म्हणाले, कर्नाटकात आळंद मतदारसंघात ही मतचोरी योगायोगाने पकडली गेली. त्याठिकाणचे BLO होते त्यांच्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून काढले होते. माझ्या नातेवाईकाचे नाव मतदार यादीतून कुणी वगळले याचा तपास बीएलओने केला, तेव्हा शेजाऱ्याने हे नाव डिलिट केले असे समजले. त्यानंतर BLO ने जाऊन शेजाऱ्याला विचारले. त्याने मला काही माहिती नाही असे सांगितले. त्यानंतर संशय बळावला. त्यानंतर तपासाची प्रक्रिया सुरू केली. त्यात कुणी ना कुणी आळंदमधून मतदार यादीतून नियोजितपणे ही नावे काढत होते. ६ हजार मते यादीतून काढली, हा आकडा जास्तही असू शकतो परंतु ६ हजार नावे पकडली गेली आणि त्यावर तपास सुरू झाला असे त्यांनी सांगितले.
‘वेगवेगळ्या राज्यातील क्रमांकाचा वापर करुन मत डिलीट केली जात आहेत. या क्रमांकावर फोन केल्यानंतर कोणीही प्रतिसाद करत नाही. या क्रमांकाचा वापर जेव्हा केला गेला, तेव्हा ते कुठे होते? त्याचा आयपी अॅड्रेस काय होता? या क्रमांकांवरुन काही सेकंदात मत डिलीट केले होते. प्रोसेस पाहायला गेले तर हे असे होणे शक्यच वाटत नाही. पहाटे ४ वाजता प्रोसेस होते. नागराज यांच्या क्रमांकावर ३६ सेकंदात नाव डिलीट केले गेले. त्यांना याबाबत काहीच माहिती नव्हती. सर्वकाही ठरवून केले जात आहे’, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




