नवी दिल्ली | New Delhi
देशातील लोकसभेच्या (Loksabha) ५४३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.०४) रोजी या सर्व जगांचा निकाल जाहीर होत आहे. सध्या सत्ताधारी भाजपची एनडीए २९५ तर विरोधकांची इंडिया आघाडी २३० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे नेमका कौल कुणाला मिळतो हे संपूर्ण निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या दोन निवडणुकीपेक्षा काँग्रेसने (Congress) दमदार कामगिरी केली करत अनेक जागांवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनीही यावेळी नेत्रदीपक कामगिरी केली असून वायनाड (wayanad) आणि रायबरेली (Raebareli) या दोन्ही जागांवर तीन लाखांपेक्षा अधिक मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा तब्बल ३ लाख ९० हजार मतांनी पराभव केला आहे. तर वायनाड या मतदारसंघातून राहुल गांधी यांनी आतापर्यंत ६ लाख ४७ हजार ४४५ इतकी मते घेतली आहेत.
तसेच या जागेवर कम्यूनिष्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवार अॅनी राजा या दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना आतापर्यंत २ लाख ८३ हजार २३ मते मिळाली आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे के सुरेंद्रन हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यांना १ लाख ४१ हजार ४५ मते मिळाली आहेत. म्हणजेच राहुल गांधी आणि द्वितीय क्रमांकाचा नेता यामध्ये एकूण ३ लाख ३४ हजार ४२२ मतांचा फरक आहे. हा मतांचा फरक भरून निघणारा नसल्याने या मतदारसंघातून राहुल गांधी यांचा विजयी निश्चित असल्याचे गृहित धरले जात आहे.