श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे आमदार विक्रम पाचपुते यांच्याविरोधात अपक्ष म्हणून लढत दिलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये जाण्याबाबतीत देखील चाचपणी केली असल्याची चर्चा असून खासदार शरद पवार यांना हा धक्का मानला जात आहे.
महाविकास आघाडीने श्रीगोंदा विधानसभेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाची असताना राजकीय घडामोडीत शिवसेनेला (ठाकरे गट) जागा सोडली. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके याना लीड दिले पण विधानसभेचे तिकीट देताना जगताप यांना डावलत तिकीट ठाकरे गटाला दिले. यातच जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवत दोन नंबरची मते घेतली आहेत. हे सर्व होत असताना आता राज्यात महायुतीला बहुमत मिळाले आहे. पुढील पाच वर्षे आता सक्षम सरकार असणार असल्याने पुढील काळात येणार्या निवडणुकीत जगताप गटाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत असणे महत्त्वाचे आहे.
येणार्या निवडणुका आणि कारखाना सक्षमीकरणासाठी सत्तेत असणार्या पक्षाच्या बाजूने जाणार अशी चर्चा माजी आमदार राहुल जगताप यांच्या बाबतीत होती. त्यांनी कुठे जायचे याबाबत चाचपणीही केली होती. नुकतेच राज्य बाजार समिती सभापती बाळासाहेब नाहटा यांनीही राहुल जगताप यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जगताप यांनी आपला राष्ट्रवादी पक्ष प्रवेश नक्की केला असून आता लवकरच ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा असतानाच जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. आता ते नक्की भाजप का राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
एनसीडीसी कर्ज मंजुरीनंतर निर्णय
माजी आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर कारखान्याची एनसीडीसीकडे कर्जाची फाईल आहे. ही फाईल मंजूर झाल्यानंतरच जगताप यांचा प्रवेश राष्ट्रवादी किंवा भाजपमध्ये होईल अशी चर्चा आहे.