पुणे/राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गुरूवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, बुधवारी बारामतीच्या पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले राहुरी विधानसभा मतदारसंघातून 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले.
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 30 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी छाननीअंती 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले असून 23 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, 7 व 8 एप्रिल या दोन दिवसांत 7 उमेदवारांनी स्वेच्छेने आपली उमेदवारी मागे घेतली आहे. आज दि. 9 एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, यामुळे निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या विविध राजकीय पक्षांकडून मतदानाची विभागणी टाळण्यासाठी इतर उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, प्रतिमा किशोर देसर्डा, कोळसे बाळू बापूराव, बिलाल गफुरभाई शेख, सुदर्शन लक्ष्मण शितोळे, अल्ताफ इब्राहिम शेख, सखाहरी शांताराम बर्डे, इम्रान नबी देशमुख या सात जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत राजकीय घडामोडींना वेग आला असून, आज दिवसभरात आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की दुरंगी, तिरंगी किंवा बहुरंगी लढत रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामतीत काय घडले ?
बारामती पोटनिवडणुकीसाठी बुधवारी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. अर्ज माघारी घेण्याचा उद्या, गुरूवारी शेवटचा दिवस आहे, त्यामुळे बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. येथे एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यातील सहा जणांनी आत्तापर्यंत माघार घेतले आहे. त्यामुळे, सध्या 47 उमेदवार रिंगणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.





