अहिल्यानगर (प्रतिनिधी)
२२३ राहुरी पोटनिवडणुकीच्या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर ४ हजार ६०२ हरकती व १ हजार ६९२ दावे प्राप्त झाले आहेत.
या प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने आक्षेपित मतदारांच्या ३ समक्ष सुनावणी व ४ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर, राहुरी व पाथर्डी तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ६ ते २४ जानेवारी या कालावधीत दावे व हरकती मागविण्यात आल्या होत्या.
या मुदतीत नमुना अर्ज क्रमांक ६ व ८ मिळून १ हजार ६९२ दावे तसेच ४ हजार ६०२ हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त हरकतींवर निर्णय घेण्यासाठी ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनावणी ठेण्यात आली आहे. तरी सदर हरकत अर्जाच्या अनुषंगाने संबंधितांनी आवश्यक त्या पुराव्यासह सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.




