अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राहुरी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि यादीतील तपशील दुरुस्तीची मुदत मागील महिन्यांत 24 जानेवारीला संपली. त्यानंतर प्रसिध्द झाल्या प्रारूप मतदार यादीवर 4 हजार 602 हरकती दाखल झालेल्या आहेत.
या दाखल हरकतींवर सुनावणी होवून येत्या 7 फेब्रुवारीपर्यंत त्या निकाली काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 14 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीच्या रिक्त झालेल्या जागेसाठी 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष मोहिमेअंतर्गत 6 जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर त्या यादीवर दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या होत्या. या हरकतीवर 7 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेऊन 14 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
पाथर्डी हरकतीवर गोंधळ
दरम्यान, दाखल हरकतीवरून पाथर्डी तालुक्यातील 38 गावात वेगळीच चर्चा सुरू असून या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या 2 हजार 300 हरकतीमध्ये हरकत दाखल करणार्यांनाच याबाबत माहिती नसल्याचे चर्चा सुरू आहे. हरकत दाखल करणार्यांच्या याद्या सोशल मीडियावर झळकल्यानंतर संबंधीतांना आपल्या नावाने मतदार यादीवर हरकती दाखल झाल्याचे समजले आहे. मात्र, ही हरकत आपण दाखल केली नसल्याचा दावा अनेकांनी केला असून यामुळे दाखल हरकतींवरून पाथर्डी तालुक्यात गोंंधळ निर्माण झाला आहे. प्रशासन मात्र, आलेल्या हरकती निकाली काढण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.




