अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी शहरात घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे लंपास करणार्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोालिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 6 लाख 46 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चोरीसाठी वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे.
11 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास राहुरी येथील संत कृपा निवास, भुजाडी इस्टेट, मल्हारवाडी रस्ता येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटांचे लॉक तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम, बँक पासबुक व सोन्याच्या पावत्या असा मौल्यवान मुद्देमाल चोरून नेला. याच परिसरातील दोन घरांमध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी भास्कर भागवत कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे 22 डिसेंबर रोजी लोणी-नांदुर शिंगोटे रस्त्यालगत गोगलगाव शिवारात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे मुक्तार मेहबुब शेख (वय 34) व शाहरूख शेखलाल शेख (वय 32, दोघे रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी सांगितली. दरम्यान, त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, दोघांनी मिळून राहुरी येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. झडतीदरम्यान संशयित आरोपींकडून विविध बँकांची पासबुक, सोन्याच्या पावत्या, धार्मिक पूजेचे साहित्य, तांब्याची भांडी, दोन मोबाईल, चोरीसाठी वापरलेली दुचाकी व 5 लाख 11 हजार 900 रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा 6 लाख 46 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




