अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी आज (दि. 26) राजकीय पक्षांच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आली आहे. नागरिकांनी व राजकीय पक्षांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
दरम्यान, नव्याने पात्र असलेल्या मतदारांची नोंदणी व दोषरहित मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वर्षा पवार यांची, तर सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून राहुरी, अहिल्यानगर, पाथर्डी व पुनर्वसन विभागाच्या तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार यादी कार्यक्रमांतर्गत 29 डिसेंबरपर्यंत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहेत. यात प्रत्येक मतदान केंद्रावर 1 हजार 200 पेक्षा जास्त मतदार असणार नाहीत, याचे नियोजन केले जाणार आहे. पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यांनी आपले मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
3 जानेवारीला प्रारूप मतदार यादी
राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी 1 जानेवारी 2026 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 3 जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, 14 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या मोहिमेत पात्र नागरिकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.
14 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी
प्रारूप मतदार यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. यानंतर 3 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. प्राप्त दावे व हरकतींचा निपटारा 7 फेब्रुवारीपर्यंत करून 14 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.




