अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहीत योग्यवेळी उमेदवार जाहीर करून निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शुक्रवारी नगरमध्ये माध्यमांशी ज्येष्ठनेते थोरात बोलत होते.
राहुरीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) माजी आ. प्राजक्ता तनपुरे या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या चर्चानी समीकरणे आणखी गुंतागुंतीची केली आहेत. यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी तनपुरे संपर्कात नसल्याचे सांगत थेट भाष्य टाळले. त्यामुळे राहूरीत काँग्रेस उमेदवार देणार का? तसेच हा उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे काँग्रेसची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या लढतीचे खरे चित्र समोर येणार आहे.
सध्या राज्यभर गाजत असलेला भोंदूबाबा अशोक खरात सोबत अनेक मंत्र्यांचे फोटो व्हिडीओ व्हायरलं होतांना पाहायला मिळाले आहे. दरम्यान खरातप्रकरणी काँग्रेसचे नेते थोरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लागावला आहे. खरातकडे राज्याचे मुख्यमंत्री गेल्यानंतर सामान्य माणूस सहज जातो. लोकांना सहाजिक वाटते येथे काहीतरी आहे. अनेक संकट, अडचणी असतात, या भावनेने लोकं जाता. खरंतर मंत्री हे समाजातील महत्वाचे माणसं आहे आणि ते तेथे गेले ही वस्तूस्थिती आहे. याचा गैरफायदा खरात याने घेतला आणि भोळ्या लोकांना, महिलांना फसविल्याचं दिसत असल्याची प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.
खेवरे यांनी घेतली थोरातांची भेट
ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण उमेद्वारी करणार असल्याचे सांगत याची पूर्वकल्पना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे खेवरे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री थोरात यांची शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये भेट घेऊन उमेदवारी करणार असल्याची माहितीही दिली आहे. त्यावर थोरात यांनी आपण यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू असेही स्पष्ट केले.
त्यांनी संगमनेरची निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे – ना. विखे
थोरात यांच्या राहुरीतील उमेदवारीच्या दाव्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. थोरातांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतलीय हरकत नाही. मात्र त्यांनी राहुरीऐवजी स्वतःची निवडणूक गांभीर्याने घेतली असती, तर बरं झालं असतं, असा टोला विखेंनी लगावला आहे. यामुळे आता राहुरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे.
पाणी योजनेवरून एकमेकांवर टीका
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या साकळाई पाणी योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यावर थोरातांनी विखे यांना चिमटा काढला आहे. मंत्रीपद आपल्या जिल्ह्याला मिळालं असल्याने आपण अपेक्षा करून पॉझिटीव्ह थिंकिंग ठेवू अशी प्रतिक्रिया दिली आहे. थोरातांना प्रत्युत्तर देताना ना. राधाकृष्ण विखे यांनी टोला लगावलाय. दुष्काळी भागाला जे पाणी देऊ शकले नाही, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. निळवंडेची चर्चाचं त्यांनी आयुष्यभर केली. परंतु आपण निळवंडेला पाणी दिलं एवढंचं नव्हे, तर आता साकळाई पाणी योजनेला देखील मंजूरी देण्यात आली असल्याची प्रतिक्रिया विखे यांनी दिली.
पाळेमुळे शिर्डीत की संगमनेरमध्ये हे समोर येईलच
खरात प्रकरणी टीका करणाऱ्या थोरात यांच्यावर मंत्री विखेंनी देखील निशाणा साधला आहे. या प्रकरणात एसआयटीची नेमणूक झाली आहे. त्यामुळे मला वाटत चौकशी पूर्ण होऊ दे. त्यामध्ये बरेच लोकांची नावे येण्याची शक्यता आहे. यामुळे खरात प्रकरणाची पाळेमुळे शिर्डीत आहेत की संगमनेरमध्ये की आणखी कुठं आहे, हे सगळं बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया ना. विखेंनी दिली आहे.




