Thursday, May 14, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपूर तालुक्याला कांदा पिकाच्या पंचनाम्याची ‘अ‍ॅलर्जी’

Shrirampur : श्रीरामपूर तालुक्याला कांदा पिकाच्या पंचनाम्याची ‘अ‍ॅलर्जी’

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये तीव्र संताप || लक्ष घालण्याचे आ. ओगलेंना साकडे

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यात मार्च 2026 व एप्रिल 2026 मध्ये झालेल्या आवकाळी पावसाने काढणीस आलेल्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगदी पीक म्हणून कांदा पिकाचे मोठे क्षेत्र असले तरी श्रीरामपूर तालुक्यात नुकसान होऊनही कांदा पिकाचे पंचनामे शासकीय यंत्रणेमार्फत केले जात नसल्याने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केले असून आ.हेमंत ओगले यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

तालुक्यात मार्च व एप्रिल 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणात आवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिटही झाली. रब्बी हंगामातील काढणी सुरु असलेल्या गहू, कांदा, हरबरा, मका, भाजीपाला, टरबुज, खरबुज या फळपिकांची तर वादळामुळे आंबा फळाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने क्षणात हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मार्चमध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारने निधीही मंजुर केला आहे. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरु आहेत. शेजारच्या तालुक्यात रब्बी हंगामी गहू, कांदा पिकांच्या नुकसानीचे सरसगट पंचनामे सुरु आहेत असे सांगितले जाते. मात्र श्रीरामपूर तालुक्यात केवळ गहू पिकांचे पंचनामे सुरु आहेत. वास्तविक शेतकरी कांदा पिकाकडे नगदी पिक म्हणून पहातो. त्यामुळे त्याचा एकरी उत्पादन खर्चही पन्नास हजाराच्यावर जातो.

मार्च ते एप्रिल महिन्यात कांदा पिकाची काढणी सुरु होते. यावेळी काढणीस आलेला कांदा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपला आहे. पात वाळलेल्या कांद्याच्या गाभ्यात पावसाचे पाणी गेल्याने हा सर्व कांदा खराब झाला आहे. या खराब झालेल्या कांद्याची साठवण क्षमता राहीली नाही. त्यामुळे बाजारभाव नसल्याने कवडीमोल भावाने हा कांदा विक्री करावा लागत आहे. त्यात उत्पादन खर्चही फिटत नसल्याने शेतकर्‍यांचा ताळेबंद तोट्याचा झाला आहे. पंचनामे करणार्‍या सरकारी यंत्रणेशी याबाबत चर्चा केली असता आम्हाला कांदा पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पंचनामे करणारी सरकारी यंत्रणा व शेतकर्‍यांमध्ये वादावादी होताना दिसत आहे. काही शेतकर्‍यांनी थेट तहसिलदारांकडे याबाबात भ्रमणध्वनीद्वारे तक्रार केलेली आहे. शेजारच्या तालुक्यात सरसगट नुकसानीचे पंचनामे सुरु असताना श्रीरामपूर तालुक्याला कांदा पिकाच्या पंचनाम्याची अ‍ॅलर्जी का? असा संतप्त सवाल केला जात आहे. आ.हेमंत ओगले यांनी याप्रकरणी लक्ष घालुन नुकसान झालेल्या कांदा पिकांचे पंचनामे करण्यासाठी सरकारी यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी आता संतप्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik MHADA Scam : बिल्डरांशी पार्टनरशिपचा अर्थपूर्ण संबंध; उपअधीक्षक काजळेंच्या पदोन्नतीचा,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik म्हाडा घोटाळ्याची (MHADA Scam) फिर्याद देऊन सिस्टिम स्वच्छ असल्याचा आव आणणारा भूमी अभिलेख विभागाचा उपअधीक्षक संशयित बिपीन काजळे (Bipin Kajle)...