राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
गावठी कट्टा (Gavathi Katta) व तीन जिवंत काडतूस (Cartridge) जवळ बाळगून परिसरात दहशत करणार्या आरोपीला राहुरी पोलिस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. ही घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) परिसरात दि. 8 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक आरोपी गावठी कट्टा (Gavathi Katta) जवळ बाळगून परिसरात दहशत करत आहे. अशी खबर एका गुप्त खबर्या मार्फत पोलिस पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार बाबासाहेब शेळके, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, सचिन ताजणे, सतिष कुर्हाडे, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.15 वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराज पुतळा परिसरात सापळा लावला.
त्यावेळी तेथे एक संशयित आरोपी (Accused) फिरताना दिसून आला. तेव्हा पोलिस पथकाने त्याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्यावेळी त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ एक गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूस आढळून आले. पथकाने 30 हजार रुपयाचा गावठी कट्टा तसेच 3 हजार रुपयाचे तीन काडतूस (Cartridge) असा 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करून आरोपीला जेरबंद केले. पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गुरुप्रसाद बाबासाहेब वाळूंज (वय 24, रा. गजानन वसाहत, राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) याच्यावर गु.र.नं. 97/2025 शस्त्र अधिनियम कलम 7, 25 प्रमाणे आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते हे करीत आहे. आरोपीला काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आरोपीला (Accused) तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.