राहुरी (तालुका प्रतिनिधी)- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश उर्फ दीपक खेवरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
उपसभापती अण्णासाहेब बाचकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली. बाजार समितीमध्ये सभापती अरूण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ सत्तेवर आहे.
खेवरे यांच्या नावाची सूचना संचालक वसंतराव कोळसे यांनी मांडली. त्यास दत्तात्रय कवाणे यांनी अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी एकच नाव आल्याने सहाय्यक निबंधकांनी खेवरे यांची निवड निश्चित केली.
बाजार समितीच्या माध्यमातून सर्व शेतकर्यांना योग्य सुविधा देण्याबरोबरच शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी सभापती अरूण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू, अशी ग्वाही खेवरे यांनी दिली.
बैठकीस संचालक प्रभाकर पानसंबळ, सुरेश बाफना, सुरेश बानकर, दत्तात्रय शेळके, अण्णासाहेब बाचकर, नंदकुमार तनपुरे, शरद पेरणे, सुभाष डुक्रे, महेंद्र तांबे, सौ. लता पवार, ज्ञानदेव भांड, रंगनाथ मोकाटे, गंगाधर गवते, अॅड. केरू पानसरे, सौ. शोभा आढाव, दत्ता खुळे, बाजार समितीचे सचिव प्रकाश डुक्रे, भिकादास जरे, सोळुंके, कोळसे, शेख आदी उपस्थित होते.