आरडगाव |वार्ताहर| Aradgav
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात मानोरी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या तडाख्यात घराचे पत्रे, विजेचे खांबसह मोठी झाडे उन्मळून पडून अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कुठलीही जिवितहाणी न झाल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचे आगमन झाले. यात मानोरी येथील मुक्ताबाई चांगदेव माळी, भाऊसाहेब देवराव जाधव, रंगनाथ देवराव जाधव, रामदास नारायण जाधव, सविता गणपत जाधव, पारुबाई गोरक्षनाथ जाधव यांच्या घराचे पत्रे दुरवर शेतात जाऊन पडले. तसेच गृहउपयोगी वस्तू अस्तव्यस्त होत उघड्यावर पडल्या व घरातील अन्नधान्य भिजले. या वादळी वाऱ्यात विजेचे खांब उन्मळून पडून विज पुरवठा खंडित झाला होता.
त्याच अरुण रंगनाथ जाधव या शेतकऱ्यांच्या घरासमोर उभी असलेल्या चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोवर मोठे झाड पडुन टेम्पोचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाने याचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे.