राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी विद्यापिठातील दोघे सुरक्षा रक्षक दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास गस्त घालीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली असून हल्ल्यात दोघे जखमी झाले. शनिवार 22 जून रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास राहुरी कृषी विद्यापीठाच्या ‘इ’ विभागात राखणीवर असलेले सुरक्षा रक्षक राहुल गायकवाड व राहुल बर्डे हे या क्षेत्रात दुचाकीवरून गस्त घालत असताना 90 तळ्याच्या चौफुली भागत आंब्याच्या बागेतून बिबट्याने दुचाकीवर अचानक झडप घेतली. यामध्ये सुरक्षा रक्षक गायकवाड व बर्डे हे खाली पडून जखमी झाले.
राहुल बर्डे यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना सदर प्रकार कळवताच शेटे यांनी ताबडतोब गस्तीवर असलेले तीन सुरक्षा पर्यवेक्षक घटनास्थळी पाठवून जखमींना तातडीने राहुरी येथील रुग्णालयात नेऊन उपचार केले. उपचार घेऊन परत जात असताना पुन्हा कालव्यावर आल्यानंतर दोन बिबट्यांचे दर्शन घडले. वरवंडी, मुळानगर शिवारात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसून येतो. त्याच प्रमाणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या दिसून येत असल्याने सुरक्षा रक्षकांचीच सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येते.
या सुरक्षा रक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठाचे तात्कालीन कुलसचिव मोहन वाघ यांनी विद्यापीठ प्रक्षेत्रात जागोजागी मचान उभारणी करण्याचे अश्वासन दिले होते. तसेच संबंधित विभागास तशा सुचनाही केल्या होत्या. परंतु संबंधित विभागाने गांभिर्याने लक्ष न दिल्याने अद्यापही मचाने उभी करण्यात आली नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षक आपला जीव मुठीत घरून विद्यापीठाचे रक्षण करीत आहेत. पुढे भविष्यात एखाद्या जंगली श्वापदाच्या हल्ल्यात एखाद्या सुरक्षा रक्षकाचा जीवही जाऊ शकतो. अशा अपरिहार्य घटना टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने व वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सुरक्षा रक्षकाच्या जीवितास धोका होणार नाही. विद्यापीठ प्रक्षेत्रात जागोजागी मचान बनवावेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वनविभागाकडून पिंजरे लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सुरक्षा रक्षकांकडून होत आहे.