राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहुरी येथील नगर-मनमाड रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या विवाह सोहळ्या दरम्यान आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी सर्व पाहुण्यांच्या डोळ्या देखत नवरीचे सुमारे २० तोळे सोन्याचे दागीने असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
राहुरी शहरातील नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या मंगल कार्यालयात काल दि. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी एक विवाह सोहळा होता. गुरूवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. रात्री ९.३० वाजता नवरदेव व नवरीकडील काही पाहुणे कार्यालयात उपस्थित होते. नवरी मुलीचे सुमारे २० तोळे सोन्याचे दागीने असलेली बॅग नवरदेवाच्या मावशीकडे होती.
मावशीने ती बॅग खांद्यावर लटकवलेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी चांगल्या पोषाखात पाहुण्या सारखे वावरत असलेले अज्ञात दोन भामट्यांनी नवरदेवाच्या मावशीच्या खांद्यावर असलेली दागीन्यांची बॅग हिसकावून कार्यालयातून पळत शिर्डीच्या दिशेने धूम ठोकली. महिलांनी आरडा-ओरडा केला. मात्र सदर दोन्ही भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस नाईक प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे, योगेश आव्हाड आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींचा शोध लागला नाही. पोलीस पथकाने मंगल कार्यालय परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोन भामटे बॅग घेऊन पळत असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरु आहे.




