Sunday, May 26, 2024
Homeनगरराहुरीच्या महिला भाविकाने शिवमंदिरात सोडला प्राण

राहुरीच्या महिला भाविकाने शिवमंदिरात सोडला प्राण

रांजणखोल, राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rajankhol| Rahuri

अहमदनगर जिल्ह्यातून जम्मू काश्मिर (शिवखोडी) तिर्थ यात्रेसाठी गेलेल्या 700 महिलांपैकी राहुरी येथील एका महिला भाविक दर्शन घेऊन आल्यानंतर पुन्हा एकदा दर्शनासाठी जात असताना चक्कर आली आणि तेथेच तिने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव सुनिता किशोर लांडे (वय 40) असे असून तिचे माहेर राहाता तालुक्यातील रांजणखोल आहे.

- Advertisement -

शिवखोडी देवस्थान भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील रियासी शहराजवळील पौनी, संगार गावात वसलेले भगवान शिव असलेले प्रसिद्ध गुहा आहे. त्यामुळे याठिकाणी तिर्थ यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने जात असतात.

राहुरी येथून शुभकीर्ती ग्रुपच्या वतीने सलग 19 व्या वर्षी काढण्यात आलेल्या राहुरी ते वैष्णोदेवी दर्शन यात्रेसाठी गेलेल्या जवळपास 1000 भाविकांची यात्रा कटरा येथे पोहोचल्यावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी पायी माता वैष्णोदेवी दर्शन घेतले. सुखरूपपणे खाली उतरल्यानंतर आराम करून दुसर्‍या दिवशी शनिवारी शिवखोडी येथे दर्शनास गेले होते. यामध्ये राहुरी येथील सुनिता किशोर लांडे (वय 40) यांनी आपल्या बरोबरच्या भाविकांसमवेत रविवारी शिवदर्शन घेतले. सर्व भाविक बाहेर आल्यानंतर पुन्हा सुनीता लांडे यांच्या मनात काय आले नी त्या पुन्हा शिवदर्शनासाठी जाऊ लागल्या. त्यांना काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याला त्यांनी दाद दिली नाही. दर्शन रांगेतील एक ग्रील त्यांनी बळजबरीने पार केला. दुसरा ग्रील पार करत असतानाच त्या अचानक खाली कोसळल्या आणि बेशुध्द झाल्या. त्याचवेळी तेथे असलेले भाविकांनी त्यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांनी तेथेच आपले प्राण सोडले होते.

तात्काळ त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले. मात्र, उपचारापुर्वीच त्या मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी शिवखोडी जम्मू काश्मिर येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभ कीर्तीचे सर्वेसर्वा सतीश तनपुरे यांनी सर्व प्रक्रिया त्वरित पूर्ण करून अमोल पालवे व दिनेश मोरे या दोन भाविकांना सोबत देऊन अ‍ॅम्बुलन्सद्वारे थेट 48 तासांच्या वर प्रवास करून सुवर्णा लांडे यांचा मृतदेह राहुरी येथे निवासस्थानी आणण्यात आला. राहुरी येथील गणपती घाट स्मशानभूमीत मोठ्या शोकाकूल वातावरणात शोकाकुल नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सुवर्णा लांडे या सेवानिवृत्त पीएसआय रामनाथ बाजीराव लांडे यांच्या स्नुषा असून त्यांच्या पश्चात दोन मुले, पती, दिर, सासू-सासरे असा परिवार आहे. सुनिता लांडे या रांजणखोल येथील लक्ष्मण ढोकचौळे यांची मुलगी तर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबासाहेब ढोकचौळे यांची पुतणी आहे. या घटनेने लांडे व ढोकचौळे कुटूबांवर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या