संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा मार्गच बदलला असून त्यातून जिल्ह्यातील संगमनेर-अकोले तालुक्याच्या विकासाला फटका बसणार असल्याने जनतेतून असंतोषाचा सूर उमटला आहे. याविरोधात रेल्वे जनआंदोलन समितीने आक्रमक भुमिका घेतली असून यासाठी सत्ताधारी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. विद्यमान आमदार अमोल खताळ यांनीच सरकारविरोधातील आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान देत त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, आ.खताळ यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याची आणि रेल्वेसाठी वेळ आली तर सरकारशी संघर्षाची भुमिका जाहीर केली आहे. मात्र या प्रकरणात आ. सत्यजित तांबे यांची भुमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते जनतेपासून काय लपवत आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे.
मार्गात बदलांसाठी महायुती जबाबदार
संगमनेर | Sangamner
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महारेलने संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांच्या जमिनी आरक्षित करून त्यांना पैसेही दिले. मात्र सरकार बदलले आणि आता शिर्डीवरून रेल्वेमार्गाचा घाट घातला जात आहे. हा मार्ग बदलण्यामागे महायुतीमधील सत्ताधारी जबाबदारी असून आता राजकारण न करता संगमनेरकरांच्या या आंदोलनामध्ये सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन रेल्वे जनआंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये नाशिक-पुणे रेल्वे ही शिर्डी मार्गे जाणार असल्याचे सांगितल्यानंतर संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, खेड, मंचर या सर्व तालुक्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी तातडीने संगमनेरकरांना एकत्र करून मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला. याला सर्वपक्षीय नागरिकांनी तातडीने पाठिंबा दिला आणि सह्यांची मोहीम सुरू झाली. याचबरोबर डिजिटल कॅम्पेनिंग आणि ऑनलाईन पिटिशन सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. ही रेल्वे संगमनेरवरूनच गेली पाहिजे याकरीता या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभारावे, असे आवाहनही आमदार तांबे यांनी केले.
रेल्वेमार्गाची दिशा बदलल्यानंतर संगमनेर तालुक्यामध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. परंतु, महायुती सरकारचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व सत्ताधारी आमदार हे मात्र या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहेत. ही रेल्वे कोणामुळे शिर्डी मार्गे गेली हे सर्व जनतेला माहीत आहे. त्यामुळे राजकीय पत्रकबाजी न करता या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्वे जनआंदोलन समितीने केले आहे.
संगमनेरवरूनच नाशिक-पुणे रेल्वे गेली पाहिजे हा सर्व लोकप्रतिनिधींसह संगमनेर तालुक्यातील जनतेचा आग्रह आहे. मात्र, हा रेल्वेमार्ग कोणामुळे बदलला हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे अधिवेशनात प्रश्न मांडू. हे गोल गोल उत्तर संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देऊ नये. त्यापेक्षा सत्ताधारी पालकमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घ्यावी किंवा प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन रेल्वे आंदोलनातील अग्रणी संगणक अभियंते श्रृती संजय रहाणे व आशिष रामकर यांनी केले आहे.
‘ते’ पोळी भाजून घेत आहेत
संगमनेर | Sangamner
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हावा, ही आमची सुरुवातीपासूनची ठाम भूमिका असून यासाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न जोरदारपणे मांडणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. मात्र, काहीजण या मुद्द्यावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यासंदर्भात आमदार खताळ म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरवरूनच व्हावा, अशी आमची प्रारंभिक मागणी आहे. पावसाळी अधिवेशनातही आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांनी जीएमआरटीचा तांत्रिक अहवाल सादर करत मार्ग बदलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की पर्यायी ट्रॅक तयार करून मार्ग बदलणे पूर्णतः शक्य आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे, त्यामुळे हा रेल्वेमार्ग संगमनेर मार्गेच व्हायला हवा, याबाबत आमची भूमिका आजही ठाम आहे.
राज्य सरकारचा या प्रकल्पात 50 टक्के वाटा असल्याने संगमनेरवर अन्याय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वेळ आली तर महायुतीतर्फे जनतेच्या हितासाठी राजकारणविरहित जनआंदोलन उभारले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जीएमआरटीचे कारण देत हा रेल्वेमार्ग बदलणार असल्याची संपूर्ण माहिती नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आमदारांना आधीपासून होती. तरीही त्यांनी ही माहिती जनतेपासून लपवून का ठेवली? केवळ राजकारणासाठी विकासाचा बळी दिला गेला का? असा प्रश्न उपस्थित करत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही पुणे-नाशिक रेल्वेमार्गाबाबत ठाम भूमिका घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी देखील लोकसभेत या विषयावर भूमिका मांडली नाही, त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद वाटत आहे
– आ. अमोल खताळ





