Friday, November 22, 2024
Homeनगरपाऊस लांबल्यास पाण्याबरोबर चारा टंचाईची तीव्रताही जाणवणार

पाऊस लांबल्यास पाण्याबरोबर चारा टंचाईची तीव्रताही जाणवणार

दीड महिना पुरेल इतकाच चारा जिल्ह्यात शिल्लक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुभत्या जनावरांची मोठी संख्या लक्षात घेता केवळ दीड महिना पुरेल इतकाच चारा सध्या जिल्ह्यात शिल्लक आहे. टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार जिल्ह्यात पशुधनाचा विचार करता केवळ जूनअखेर किंवा अधिकतम जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपलब्ध चारा टिकू शकतो. ठराविक महसूल मंडळात काही प्रमाणात चारा टंचाई जाणवू लागली आहे. पाऊस लांबल्यास पाण्याबरोबरच चारा टंचाईची तीव्रताही जाणवणार आहे.

दरम्यान गेली काही दिवस निवडणुकीत व्यस्त असलेली जिल्हा प्रशासनाची यंत्रणा आता मोकळी झाल्याने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी उद्या, शुक्रवारी (दि. 17) जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक बोलावली आहे. जिल्ह्यात 13 लाख 16 हजार 643 मोठी जनावरे आहेत तर 2 लाख 83 हजार 17 लहान अशी एकूण 15 लाख 99 हजार 858 जनावरे आहेत. एका मोठ्या जनावराला रोज 15 किलो हिरवा व 6 किलो कोरडा चारा तर लहान जनावरांना 6.5 किलो हिरवा चारा व 3 किलो कोरडा चारा आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्याला

एकूण 10 लाख 33 हजार 632 टन हिरवा व 33 लाख 30 हजार 823 टन चार्‍याचे आवश्यकता आहे. याशिवाय शेळ्या-मेंढ्यांची संख्या 24 लाख 79 हजार आहेत. पारनेर तालुक्यातील खडकवाडी व सावरगाव, शेवगाव तालुक्यातील बेलगाव, पाथर्डीतील माणिकदौंडी परिसरात चारा टंचाई भासू शकते. इतरत्र मात्र चारा टंचाई जाणवणार नाही, असा पशुसंवर्धन विभागाचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात सध्या 314 टँकरमार्फत 292 गावे, 1560 वाड्यावस्त्यावरील 5 लाख 73 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा सुरू आहे. राज्य सरकारने सन 2018 मध्येच टँकरमार्फत पाणीपुरवठा करताना गावांमध्ये जनावरांच्या पिण्यासाठी एक अतिरिक्त खेप टाकली जावी, असे आदेश काढले आहेत. मात्र माणसांच्याच पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पुरेशा खेपा होत नसताना जनावरांच्या पाण्याची काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चारा पिकांसाठी प्रशासन सरसावले
सध्या ज्वारी, मुरघास, हिरवा चारा असा एकूण 2 कोटी 3 हजार टन चारा उपलब्ध आहे. मुरघासमुळे चारा टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय पशुसंवर्धन विभागाने 4487 हेक्टरवर चारापिके घेण्यासाठी 117.99 मेट्रिक टन बियाणांचे वाटप पशुपालकांना केले आहे. मका व बाजरीचेही बियाणे एक हेक्टरसाठी 4 हजार रूपयांपर्यंत मोफत दिले जाते. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 204 एकर वर चारा म्हणून बोधन ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जिल्ह्यातील चारा बाहेर नेण्यास बंदी घातली आहे. सध्या ज्वारी कडब्याचे भाव अडीच ते तीन हजार रूपये टन असे स्थिर आहेत. वाढ्याचे दरही दोन ते अडीच हजार रूपये टन आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या