अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यातील 219 गावे आणि 1 हजारांच्या जवळपास 219 सरकारी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात मान्सून दमदार झाल्याने अनेक गावातील पाणी पुरवठा स्त्रोत सुरू झाले आहेत. यामुळे गेल्या दहा दिवसांत आठवड्यात 97 टँकर बंद झाले आहे. काही गावातील विहिरींना सध्या गढळू पाणी असल्याने टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात अजूनही 200 हून अधिक गावात पाणी टंचाईसदृष्य परिस्थिती असून टंचाई कृती आराखड्याला 30 जूनपर्यंत मुदत असल्याने त्यानूसार टंचाईच्या उपाययोजना सुरू राहणार आहेत.
यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत वाढलेल्या उष्णता आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्रामीणसह शहरी भागात अचानक पाण्याचे उद्भव कोरडे पडले होते. त्यामुळेे दररोज पाण्याच्या टँकरच्या मागणी वाढत होती. जिल्ह्यातील साडेपाच लाखांहून अधिक जनतेला सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागत होता. यामुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली होती. एकीकडे लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर मतमोजणी यामुळे टेन्शनमध्ये असणार्या जिल्हा प्रशासनाची अडचण वाढली होती. मात्र, अशा परिस्थितीत दर आठवड्याला जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी टंचाईची बैठक घेवून उपाययोजना राबवल्या.
जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणी टंचाई निर्माण झाली. एप्रिल- मे महिन्यांतच जिल्ह्यात पाणी टंचाईचे स्वरूप तीव्र झाले आहे. पाथर्डी, संगमनेर, पारनेर, नगर, कर्जत-जामखेड तालुक्यात त्याची तीव्रता अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने या विषयावर लक्ष केंद्रीत केले होते. मात्र, जून महिन्यांत जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला. यामुळे कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी यासह नगर, पारनेर, पाथर्डी या तालुक्यात पाण्याच्या टँकरच्या संख्येत मोठी घट आली आहे.
यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत जिल्ह्यात पाथर्डी, नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, अकाले, कोपरगाव, नेवासा आणि राहाता या तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाण्याचे टँकर सुरू होते. तर राहुरी आणि श्रीरामपूर तालुका टँकरपासून वाचून होते. या दोनच तालुक्यात उन्हाळ्यात टँकरची गरज लागली नाही.