अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सोमवार (दि. 22) रोजी झालेल्या पावसात सहा तालुक्यात 41 घरे पडली असून चार तालुक्यातील 14 जनावरे वाहून गेलेली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या प्राथमिक पंचनाम्यात ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, शनिवारपासून सुरू झालेला पाऊस अनेक तालुक्यात अद्याप कोसळत असल्याने शेतीसह घरांचे झालेले नुकसान याची माहिती आणि पंचनामे करतांना महसूलसह कृषी विभागाची दमछाक होतांना दिसत आहे.
यापूर्वीही जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांच्या 17 तारखेपर्यंत राहाता आणि कोपरगाव तालुका वगळता उर्वरित तालुक्यात अतिवृष्टी- ढगफुटीसदृष्य पावसात सहा व्यक्तींंसह 12 ठिकाणी पशूहानी, घरांची पडझड झालेली होती. यात 137 जनावरे वेगवेगळ्या कारणामुळे दगावली असून 153 घरांची पडझड झालेली होती. हा आकडा दिवसंदिवस पडणार्या पावसामुळे वाढतांना दिसत आहे. 22 तारेखला जिल्ह्यात चार तालुक्यात 14 ठिकाणी नव्याने पशूहानी झाली असून यात जाखमेडमध्ये 4, राहुरीत 2, संगमनेरमध्ये 6 आणि नगर तालुक्यातील दोन लहान-मोठ्या जनावरांचा समावेश आहे.
तर सहा तालुक्यात 41 घरांची पडझड झालेली असून यात राहुरी 6, संगमनेर 1, नगर 4, कर्जत 5, नेवासा 5 आणि जामखेड तालुक्यातील 1 घरांचा समावेश आहे. ही प्राथमिक स्वरूपाची असून पाऊस उघडल्यानंतर यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात शेवगाव, पाथर्डी, नगर, जामखेड आणि राहुरी तालुक्यातील काही ठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वारंवार एकाच मंडळात अतिवृष्टी होतांना दिसत आहे. यामुळे शेती पिकांचे पंचनामे करतांना अडथळे असून पुढील आठ दिवसात शेती पिकांचे होणारे नुकसान समोर येणार असल्याचे कृषी विभागाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांत झालेल्या जादाच्या पावसाने शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन, चारा पिकांसह अन्य कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले असून सध्या अनेक तालुक्यात शेतातील उभ्या पिकात पाण्याचे तळ साठलेले आहे. यामुळे अनेक तोंडाशी आलेल्या शेतकर्यांचा घास हिरावला गेला आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकर्यांनी पिक विमा योजनेतील बदलामुळे त्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारच्या मदतीवर बळीराजाला अवलंबून रहावे लागणार आहे.




