मुंबई | Mumbai
महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) दरवर्षी ७ जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून (Monsoon) यंदा १० ते १२ दिवस आधीच दाखल झाला आहे. महाराष्ट्रात आज तळ कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे. काल केरळ (Kerala) मध्ये दाखल होऊन मान्सूनने एक सुखद धक्का दिला होता. यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यावर त्याच्या प्रवासासाठी वातावरण देखील अनुकूल असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने (Rain) जोर धरला असून, त्यात आता हवामान विभागाने मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे. कोकण, मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसात पावसाची काय स्थिती असेल हे देखील हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. कोकणात मान्सूनचा जोर वाढला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज २५ मे रोजी दक्षिण कोकणात मान्सून दाखल,राज्यात आगमनाच्या जवळपास १० दिवस आधीच.(५ जून सामान्य तारीख). राज्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे व निश्चितच मान्सून संबंधित कामांना गती मिळेल.राज्यात मान्सूनच्या पुढील आगमनासाठी अनुकूल परिस्थिती.
राज्यात मान्सून आगमन २०११ ते २०२५ आलेख खाली. pic.twitter.com/46egg9fpxR— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 25, 2025
भारतीय हवामान खात्याने (IMD) कोकण आणि गोव्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ज्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यातही जोरदार पाऊस होणार आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळी वातावरण असेल. काही ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे ३० ते ४० किमी/तास अपेक्षित आहेत. त्यासोबतच पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी गारांसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भात पुढील तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि घाट परिसरात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. कोकण, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत, तर विदर्भ आणि मराठवाड्यात (Marathwada) यलो अलर्ट आहे.
कसा असेल यंदाचा मान्सून?
यंदा देशासह महाराष्ट्र राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागानेजाहीर केली आहे. यंदा देशात मान्सूनच्या पावसाचे प्रमाण १०७ टक्क्यांच्या आसपास राहू शकतं अशी शक्यता आहे.




