जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर देखील जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला होता.
मात्र आज मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे पाऊणतास धो-धो बरसल्यानंतर शहरातील सखोल भागात पाणी साचले होते. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांचे मात्र प्रचंड तारांबळ उडाली.
मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्यासह देशभरात वादळाने हाहाकार माजविला होता. अनेक राज्यात वादळीवार्यामुळे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर राज्यात मान्सून दाखल झाला असून गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने प्रचंड उकाडा सहन करावा लागत होता. मात्र आज दुपारच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार होत जोरदार पावसाला सुरुवात झाली.
धो-धो सुरु असलेल्या पावसाने संपुर्ण शहराला झोडपून काढले. शहरात पहिलाच पावसाने चाकरमान्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरणत निर्माण झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्य सुमारास पुन्हा पावसाला सुरवात झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाऊणतास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील सखोल भागात पाणी साचले होते. यामध्ये नवीपेठ, बजरंग बोगदा, बी. जे. मार्केट, यासह विविध भागात पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून कसरत करीत मार्ग काढावा लागत होता.
पहिल्याच पावसाने उडविली धांदल
महापालिकेकडून नालेसफाईसह मान्सूनपूर्ण कामांचा केवळ देखावा करण्यात आला. त्यामुळे पहिल्याच पावसाने शहरातील सखोल भागात पाणी साचल्याने नागरकांनी धांदल उडविली. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांनी मनपाकडून केल्या जाणार्या मान्सूनपूर्व कामांप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली.
विक्रेत्यांची तारांबळ
अचानक वातावरणात बदल होत पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील बाजारपेठेत दुकाने थाटलेल्यांची प्रचंड तारांबळ उडाली. दरम्यान पाऊस देखील जोरात असल्याने पायी जाणार्यांना देखील चालतांना चांगलीच कसरत कराव लागल होती.
शेतीच्या कामांना येणार वेग
मान्सूनर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र तेव्हा पाऊस पावसाने दडी मारल्याने पेरणीसह सर्वच शेतीची कामे ठप्प झाली होती. कृषी विभागाकडून देखील पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याशिवायी पेरणी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु आज दुपारी व सायंकाळच्या सुमारास झालेल्या धो-धो पावसामुळे शेतकर्यांकडून समाधान व्यक्त केले जात होते. तसेच आज झालेल्या पावसामुळे आता शेतीच्या कामांना देखील वेग येणार असून बळीराजा देखील सुखावला आहे.
संपुर्ण शहरत चिखलमय
शहरात अमृत व भुयारी गटारी योजनेचे काम सुरु आहेत. त्यामुळे संपुर्ण शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते कत्रांटदाराने खोदून ठेवले आहे. पाऊस पडल्यानंतर मुख्य रस्त्यांसह गल्ली बोळातील रस्त्यांवर प्रचंड चिखल होत आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळ्यात शहर वासियांना चिखलाचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आता दिसून येत आहे.