शेखर गायकवाड
पावसाळा आला वृक्षारोपण करायचे पण आम्हाला या वृक्षारोपणाची खरी व्याख्या माहीत आहे का हो? आता वेळ आली आहे, वृक्षारोपण म्हणजे काय हे नीट समजून घेण्याची….!
मित्रांनो, वृक्षलागवडीचा उद्देश हा पर्यावरण संवर्धनाकरिता योग्यच आहे; मात्र आपण हे करताना काही खूप मोठ्या चुका करत आहोत. या चुका अजाणतेपणाने घडणाऱ्या जरी असल्या तरी त्यामुळे आपला उद्देशाला हरताळ फासला जाऊ शकतो. यामुळे आपण वेळीच जागरूक होणे गरजेचे आहे.
अगोदर आपण वृक्षारोपण करताना रेन-ट्री, गुलमोहर, पेल्ट्राफॉर्म, अकेशिया, स्पॅतोडिया यासारख्या प्रजातींची झाडे लावून ती वाढवून केवळ डोळ्यांना हरित दिसेल याची तजवीज करुन ठेवलेली आहे. यामुळे आपल्या परिसराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता आपल्या लक्षात आले आहे, की देशी झाडे लावली पाहिजे आणि आता जो तो उठतो तो नर्सरीमध्ये जाऊन वड, पिंपळ, उंबर या प्रजातींची मागणी करताना दिसतो.
आपण जेव्हा जैवविविधतेचा विचार करतो तेव्हा नुसतं वड, पिंपळ, उंबर, लावून चालणार नाही तर याव्यतिरिक्तही अजून देशी प्रजाती अस्तित्वात आहे. गरज आहे आपला वृक्षअभ्यास वाढविण्याची. तसेच काही ठिकाणी दुरदृष्टी न ठेवता विदेशी M…
forest (या पध्दतीने forest या नावाला लागलेला काळीमा) या नावाने हजार, दोन हजार चौरस फुट जागेमध्ये दाटी म्हणजे दीड दोन फुटांवर रोप लावून चालणार नाही.
शिवार वाचन करा…
वृक्षारोपणासाठी ज्या जागेची निवड केली त्या परिसराचे आपण थोडक्यात वृक्षारोपणाच्या दृष्टीने वाचन करणे गरचेजे आहे. त्याला आपण शिवार वाचन असे म्हणूया… अशा ठिकाणी जागेचा उपलब्धतेनुसार योग्य अशी प्रदेशनिष्ठ झाडांची निवड करणे अपेक्षित आहे. आजकाल एक चांगली गोष्ट दिसून आली आहे. या कोरोना महामारीमुळे बरीचशी मंडळी एकत्रित आली आहे. कोणाला डोंगरावर झाडे लावायची आहेत तर कोणाला गावाजवळ उपलब्धतेनुसार एक-दोन एकरात वृक्षारोपण करायचं आहे आणि डोळ्याला पटकन दिसतील अशी नऊ ते दहा फुटांची नेहमी उपलब्ध असलेल्या प्रजातिंची रोपे आणून लागवड करण्यामध्ये ही मंडळी समाधानी आहे. मित्रांनो वृक्षारोपण हा सोपस्कार नाहीये एक जबाबदारीने पार पाडण्याची प्रक्रिया आहे हे पक्क लक्षात घेण्याची गरज आहे.
योग्य ठिकाणी , योग्य वृक्ष प्रजातीची निवड ही काळाची गरज आहे. माझ्या पर्यावरण प्रिय मित्रांना मी एवढेच सांगू इच्छितो, (पर्यावरणपुरक वृक्ष लागवडीच्या मागील २४ वर्षाच्या अनुभवातून) आपल्या परिसरामध्ये जी पूर्वी झाडे होती आता काही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि ती झाडे खूप आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणासाठी उपयुक्त आहेत. अशा वृक्षांची रोपे मिळवून किंवा तयार करून आपल्या परिसरात लावण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण हेच खरं वृक्षारोपणाचे अभ्यासपूर्ण तत्व आहे. वृक्षरोपण म्हणजे डोळ्याला पटकन हिरवळ दिसण्यासाठी नाही तर ती एक शुद्ध वातावरण निर्मितीसाठी जबाबदारीने व पुढे त्याच्या वाढीसाठी संयमाने स्वीकारण्याचे व्रत आहे. चला तर मग वृक्षारोपण करताना विविध प्रदेशनिष्ठ व देशी झाडांची निवड करूया आणि खऱ्या अर्थाने पर्यावरण अन् जैवविविधतेची साखळी टिकवून ठेवण्यास हातभार लावूया…!
आपलं पर्यावरण संस्था नाशिक. 9422267801