नाशिक । शैलेंद्र तनपुरे – सल्लागार संपादक
सुधाकर बडगुजर ते सुनील बागुल असा पक्षांतराचा पंधरवडा एवढा गाजला की त्यामध्येही अनेकांचे झालेले मतपरिवर्तन पाहता, अभ्यासता नेमकेपणाने त्याचे विश्लेषण राहूनच गेले होते. बुळकांड लागावे तसे शिवसेना ठाकरे गटातून एकेक असे काही बाहेर पडत होते की प्रत्येकावर लिहायला लागलो तर त्याचाच एक ग्रंथ तयार होईल. म्हणून ही बुळकांडीची साथ संपेपर्यंत थांबणे योग्य राहील, असा विचार केला. सुनील बागुल व मामा राजवाडे यांचे भाजप प्रवेश ऐनवेळी थांबले असले तरी बडगुजरांप्रमाणेच आज ना उद्या त्यांचे शुद्धीकरण होणारच असल्याने व आणखीही काही गळणार असल्याने सगळ्यांचाच वेध घेणे आता गरजेचे वाटते.
गेल्या पंचवार्षिकमध्ये मूळ शिवसेनेचे नाशिक महापालिकेत पस्तीस (35) नगरसेवक विजयी झाले होते. याव्यतिरिक्त निवडणुकीपूर्वी म्हणजे साधारण तीन वर्षांपूर्वी भाजपसह इतर काही पक्षांमधील अनेक नगरसेवकांनी तेव्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. हे जे कोणी इकडून तिकडे उड्या मारत असतात, ते साधारण जनमताचा कानोसा घेतात, असे सांगितले जाते. तसे असेल तर तीन वर्षांपूर्वी शिवसेनेची पालिकेत सरशी होईल, असा अंदाज आल्यानेच तिकडे जाणार्यांची गर्दी वाढली होती. प्रत्यक्षात निवडणुकाच झाल्या नाहीत. नंतर तर जे महाभारत घडले त्यात शिवसेना हा पक्षच वाहून गेला. सध्या ठाकरे व शिंदे अशा दोन शिवसेना आहेत.
शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असल्याने साहजिकच सत्तेकडे ओढा असलेली माणसे लोहचुंबकाप्रमाणे ओढली जात आहेत. 35 पैकी 26 जणांनी शिंदेंच्या शिवसेनेत तर उर्वरित चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटात आता केवळ पाच नगरसेवक शिल्लक राहिले आहेत. सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे निमित्त झाले अन् त्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली गेली. त्याच दिवशी पक्षाचे तत्कालीन महानगरप्रममुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाहास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. विलास शिंदे यांनी आपणही नाराज असल्याचे उघडपणे सांगितले होते. तरीही त्यांना ‘मातोश्री’वर नेऊन व नंतर मुंबईत पत्रकार परिषदेत ते पक्षातच असल्याचे वदवून घेण्यात आले. दोनच दिवसांनी पुन्हा त्यांनी पक्षाच्या नाकावर टिच्चून एकनाथरावांचे नाशिकमध्ये जाहीर स्वागत केले. तरीही ठाकरे गट बेसावध राहिला.
शिंदे गेल्यानंतर मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख केले गेले. ही नियुक्तीही अशीच तडकाफडकी केली. चार दिवसांनी मामाही पळाले. बागुल यांच्यासोबत ते भाजपमध्ये जाणार होते, पण त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे प्रवेश तूर्तास थांबला आहे. त्यांच्याबरोबर गेलेले प्रशांत दिवे, समीर मराठे, सीमा कन्नू ताजणे आदी माजी नगरसेवकांचे मात्र प्रवेश झाले. दिवे हे तर आदल्या दिवशीही आपण कसे निष्ठावान आहोत याची द्वाही फिरवत होते. सीमा ताजणे व त्यांचे पती कन्नू ताजणे यांनीही दोन दिवस आधीच डॉक्टर्स दिनानिमित्त शहरातील डॉक्टरांचा सत्कार केला होता. या कार्यक्रमास उपनेते दत्ता गायकवाडांसह उरलीसुरली शिवसेनाही उपस्थित होती. दोन दिवसांत असे काय घडले की ताजणे दाम्पत्य स्वगृही गेले. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक नंतर भाजप, पुन्हा शिवसेना अन् आता पुन्हा भाजप असा या दाम्पत्याचा प्रवास आहे. प्रशांत दिवे हे शिवसेनेकडून तर त्यांचे बंधू राहुल हे काँग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोघांचे माता-पिताही नगरपिते होते. अशोक दिवे यांनी तर शिवसेनेच्याच पाठिंब्यावर महापौरपदही भूषवले. अर्थात या घराण्यालाही पक्षांतराचा इतिहास असल्याने कोणी फार काही मनावर घेतले नाही.
शहराप्रमाणेच ग्रामीण भागातूनही ठाकरे गट जवळपास साफ होत चालला आहे. अनेक तालुकाप्रमुख, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, माजी आमदार अशा सगळ्यांनीच जय महाराष्ट्र केल्याने अनेक ठिकाणी तर निवडणुका लढायचे म्हटले तरी उमेदवार सापडणे महाग होणार आहे. तरीही शिवसेनेचे नेते मात्र भगवा फडकणारच अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा देतात तेव्हा हे कोणत्या जमान्यात वावरत आहेत, असा प्रश्न पडतो. शहर व जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख नेत्यांनी जय महाराष्ट्र केल्याने आता उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे असे तिघेच बिनीचे शिलेदार राहिले आहेत. गिते व पांडे हे मध्ये काहीकाळ इतर पक्षांची सफर करून आलेले आहेतच. आता गितेंचे चिरंजीव व माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांना महानगरप्रमुखपदी घाईघाईने बसवले गेले आहे. राजवाडे पळाल्यानंतर ऐनवेळेवर हातचा सापडावा तसे गितेंकडे हे पद आले. त्यांचा अनुभव, क्षमता अशा कशाचीही फिकीर पक्षाला पडली नाही. नगाला नग उभा करावा तशा नियुक्त्या गेल्या काही महिन्यांपासून केल्या जात असून त्यातून केवळ शिवसेनेचे वरिष्ठ सर्वार्थाने भरकटले असल्याचेच दिसते.
मुळात वर्षभरात व विशेषत: शिंदे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबवण्यासाठी पक्षाने काहीही प्रयत्न केलेले दिसत नाही. किंबहुना काही लोक गेलेच पाहिजे, अशीच रणनीती होत आलेली दिसली. काहींच्या पक्षांतराबाबत तर गावातील शेंबड्या पोरालाही माहिती असेल पण शिवसेनेच्या नेत्यांना त्याची साधी भनकही लागू नये, हे विशेष वाटते. सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्याबाबत तर गेल्या वर्षभरापासूनच चर्चा होती. त्यातून पक्षाने काय बोध घेतला तर अगदी नाईलाज म्हणून नंतर बडगुजर यांचे पद बदलले. त्याचवेळी शिंदे यांना अपेक्षित पद दिले गेले नाही. हे का व कशासाठी याची साधी चर्चाही झाली नाही. समजा या दोघांवरही विश्वास राहिलेला नव्हता तर तेव्हाच काही तरी उपाययोजना का केली नाही, असे प्रश्न शिवसेनेत विचारायचे नसतात. तिथे संजय राऊत नावाची एक अगाध अशी शक्ती कार्यरत असल्याने त्यांना सारे समजते, सारे कळते या भरवशावरच पक्ष चालत आला आहे. खरे तर पक्ष चालत आला म्हणण्यापेक्षा पक्ष चालला (म्हणजे रसातळाला) असेच म्हणणे संयुक्तित ठरेल.
विलास शिंदे जाणार ही काळ्या दगडावरील रेघ होती. तरीही त्यांना चुचकारत राहिले. समजा ते गरजेचे होते, तर त्यांना हवे ते पद देऊनही थांबवता आले असते. सुनील बागुल आपल्या सार्या कंपनीसह जाणार याचीही सार्या गावाला कल्पना होती. अगदी बागुल महाजनांना कधी भेटले, शिंदे त्यांना काय म्हणाले अशा सार्या गोष्टी सामान्यांपर्यंत येत होत्या. फक्त ठाकरे गटाच्या नेत्यांना तेव्हा बधीरपणा कसा येत होता, हेदेखील कळायला मार्ग नाही. शिंदे गेल्यानंतर मामा राजवाडे यांना महानगरप्रमुख करतानाही काहीही विचार झालेला दिसत नाही. बागुल यांचे व्यावसायिक सहकारी यापलीकडे या राजवाडेंची काय मातब्बरी आहे हे किमान स्थानिक नेत्यांना तरी कळायला हवे होते. दाढी वाढवली म्हणजे कट्टर शिवसैनिक झाले या जमान्यातून आता पक्षाने तरी बाहेर पडायला हवे. जमाना बदलला आहे, याचे भान येणार नसेल तर हा बुळकांडी रोग बरा कसा होणार? आजकाल प्रत्येक लग्नात नगरदेव हमखास दाढीधारीच असतात. ती फॅशन आहे. याचा अर्थ सगळेच शिवसैनिक किंवा त्या विचाराचे आहेत असे समजणे म्हणजे तद्दन बावळटपणा झाला.
संजय राऊत यांच्याकडे नाशिकच्या शिवसेनेची जबाबदारी पूर्वीपासून आहे. अधूनमधून तक्रारी, सूचना झाल्यानंतर त्यांच्या जबाबदारीत बदल होतात. परंतु पक्षात फूट पडल्यानंतर राऊत हे केवळ नाशिकचेच नव्हे तर संपूर्ण राज्यातच पक्षप्रमुखांनंतरचे नेते झाल्याचे बघायला मिळत राहिले. साहजिकच आधीच त्यांचा दबदबा होता, आता तर एकप्रकारची दहशत झाली. राऊत म्हणतील ती पूर्वदिशा हा शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम बनला. त्यातून त्यांचे कट्टर बडगुजर यांचाही कार्यक्रम झाला. राऊत यांच्यामुळे बडगुजरांचे अनेक वर्षे पक्षात फावले हे खरे असले तरी नंतर केवळ राऊत यांच्यामुळेच त्यांना जावे लागले. हीच गत भाऊ चौधरी यांची. हे दोघेही राऊत यांचे जीव की प्राण. पण दोघांनीही राऊत यांची साथ सोडली. या दोघांमुळेच काही जणांनी शिंदे गट जवळ केला. आज सगळीच मंडळी शिंदे गटात जमली आहे. तेथेही आपापली भलीबुरी कहाणी आळवत आहेत, पण तो सत्ताधारी पक्ष असल्याने काहीही झाले तरी गपगुमान राहावे लागत आहे. विलास शिंदे खरे तर सामान्य कार्यकर्ता. दशरथ पाटील यांच्या पतनानंतर शिंदे यांना शिवसेनेने लिफ्ट देताना पदांची खैरात केली. अनेक पदे त्यांनी भूषवली. आज जे त्यांचे मोठेपण दिसते ते केवळ पक्षामुळेच. तरीही ते जेव्हा अन्याय झाला म्हणून गेलो असे म्हणतात तेव्हा त्यांची जागा दाखवून देणाराही ठाकरे गटात असू नये, ही खरी व्यथा आहे.
दत्ता गायकवाड ठामपणे पक्षात राहिले असले तरी त्यांच्याही कार्यशैलीला कंटाळून काहींनी आपापले मार्ग चोखाळले आहेतच. सगळ्याच पक्षात अशा भरती-ओहोटीच्या लाटा उसळत असतातच. परंतु त्या लाटांवर स्वार कसे व कधी व्हायचे याचे गणित सर्वांनाच जमत नाही. सध्या भाजप व शिंदेंच्या शिवसेनेला हे जमले आहे, कारण ते सत्तेत आहेत. सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी त्यांच्याकडे आहे. मुख्य म्हणजे हात सैल करण्याची तयारी तर आहेच, शिवाय अपार कष्ट करण्याची तयारी आणि सर्वांनाच सामावून घेण्याचा दिलदारपणाही त्यांच्या ठायी आहे. दुर्दैवाने ठाकरे गटात या सगळ्यांचाच अभाव सध्यातरी कटाक्षाने जाणवतो. पक्ष दिवसागणिक रसातळाला जात असताना केवळ माध्यमांमध्ये पोपटपंची करण्यापेक्षा गावोगावी जाऊन उरलेल्या कार्यकर्त्यांशी जीवाभावाच्या गप्पा मारल्या तर काही प्रमाणात गळतीला ब्रेक लागू शकेल. अनेक जण तरी केवळ पक्ष विचारतच नाही, एवढ्या कारणानेही नाराज असतात.
पक्षाची अवस्था अशी दिवसेंदिवस करोना साथीतील रुग्णासारखी होत असताना मुंबईतील नेत्यांनी सातत्याने दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये आशेचा किरण जागवण्याच्या लसीची गरज आहे. कधीतरी शिबिरे घेतली जातात. भाषणे केली जातात. दुसर्या दिवसापासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू होते. गंभीर कोणीच नाही. आतादेखील खासदार राजाभाऊ वाजे, दत्ता गायकवाड, वसंत गिते आदी मंडळी दररोज बैठका घेऊन काही प्रयत्न करताना दिसतात. परंतु पक्षाकडून त्यासाठी काही मार्गदर्शन, मदत किंवा सपोर्ट सिस्टिम मिळत असावी, असे वाटत नाही. नाशिकमध्ये एकेकाळी शिवसेनेचा दबदबा होता. पालिकेत सत्ताही होती. पुढे सगळाच इतिहास झाला. आज पक्षाकडे केवळ पाच नगरसेवक राहिले आहेत. त्यातील आणखी एक-दोन आगामी काळात गळाले तरी आश्चर्य वाटू नये. या पाच जणांना टिकवण्यासाठी तरी पक्षाकडे काही कार्यक्रम आहे का? तर नाही, असेच त्याचे उत्तर येईल.
सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, हे खरेच. सत्ता आहे म्हणूनच भाजप व शिंदे गट शिवसेनेचे लचके तोडत आहेत, हेदेखील तेवढेच सत्य; परंतु त्याविरोधात आवाज उठवण्याच्या मानसिकतेत दुर्दैवाने एकही शिवसैनिक नाही. प्रत्येकालाच स्वत:ची किंमत करायची आहे. जो अधिक भाव देईल तो मालक, या वृत्तीने पक्षाचा घात झाला आहे. त्यातून बाहेर पडण्याची तयारी ही आधी मानसिक करावी लागेल. कारण पराभव हा मनात असतो. तसा तो तमाम शिवसैनिकांच्या मनात शिंदे व भाजपने पेरून ठेवलाय, त्याला कोंब फुटून फळे, फुले लागण्याआधीच त्याची खुरपणी करणे ठाकरे गटाला शक्य होईल का?




