नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला तीन दिवसांचा नाशिक दौरा अर्धवट सोडून आज अचानक मुंबईकडे रवाना झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काल गुरुवारी त्यांनी नाशिकमध्ये आगमन करून निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
राज ठाकरे यांनी काल नाशिकमध्ये तरुण कार्यकर्त्यांसोबत तसेच भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली होती. या बैठकींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. तसेच आज दिवसभर काही महत्त्वाच्या बैठका आणि संवादाचे नियोजन केले होते. आज सकाळी काही ठराविक बैठकांनंतर राज ठाकरे यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास नाशिक सोडून मुंबईला रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अचानक निघून जाण्याने नाशिकमधील पदाधिकारी व कार्यकर्ते चक्रावून गेले असून दौरा रद्द करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.