मुंबई । Mumbai
मुंबई येथील वांद्रे येथे असलेल्या रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबीर पार पाडले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मुंबईतील या शिबिरात त्यांनी ‘मराठीचा मुद्दा घराघरात पोहचवा,’ अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही काळापासून मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येणार का? यावर जोरदार चर्चा सुरु आहेत. अशामध्ये राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करताना, ‘ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्यवेळी भाष्य करेन,’ असे विधान केले आहे. तसेच त्यांनी यावेळी आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा असा संदेश दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, “आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा. 20 वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? आपापसातले हेवेदावे संपवा आणि कामाला लागा,” अशा पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. “स्थानिक मुद्द्यांसाठी मैदानात उतरून काम करा. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषेचा द्वेष करू नका. कोणालाही न घाबरता आत्मविश्वासाने काम करा,” असेदेखील आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्यांना स्विकारा. मुंबई महानगरपालिकेत मनसे 100 टक्के सत्तेत येणार, असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या. ते म्हणाले की, विनाकारण कोणालाही मारू नका आधी समजवून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल, तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका, पण उर्मट बोलला तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असेही त्यांनी सांगितले. तसेच या घटेनाचा व्हिडिओ काढू नका, असाही पुनरुच्चार त्यांनी केला.




