मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक घडामोडी घडत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे अखेर एकत्र आले असून, त्यांच्या युतीची अधिकृत घोषणा आज होणार आहे.
स्मृतिस्थळावर अभिवादन आणि एकत्र प्रवास युतीची घोषणा करण्यापूर्वी ठाकरे बंधूंनी अत्यंत भावनिक आणि प्रतिकात्मक पाऊल उचलले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब दादर येथील शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले. विशेष म्हणजे, स्मृतिस्थळावर येताना दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करत दाखल झाले, ज्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे.
जागावाटप आणि निवडणुकांचे समीकरण मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेसह पुणे, ठाणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिका निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागावाटपाची चर्चा जवळपास अंतिम झाली असून ‘मेरिट’च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. मुंबईत मराठी बहुल भागांमध्ये दोन्ही पक्षांनी समसमान जागा लढवण्याचे धोरण स्वीकारल्याचे समजते.
ठाकरे बंधूंच्या या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीसमोर मोठे आव्हान उभे ठाकण्याची शक्यता आहे. ‘मराठी माणूस एक आहे’ हा संदेश देण्यासाठी आजची ही घोषणा अत्यंत निर्णायक ठरणार आहे.




